राममंदिर निकालाने भाजपाचे दुकान बंद झाले; कॉंग्रेस

0

नवी दिल्ली: पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या निकाल आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी लावला. या निकालावर कॉंग्रेसने प्रतिक्रीया दिली असून ‘अयोध्या प्रकरणाच्या निकालामुळे राम मंदिराचे दरवाजे खुले झाले, हे खरे आहे. मात्र, त्याचबरोबर या निकालामुळं सत्तेच्या भोगासाठी श्रद्धेचं राजकारण करण्याचे मार्ग बंद झाले आहेत,’ अशी मार्मिक प्रतिक्रिया निकालानंतर दिली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल न्यायालयानं दिला आहे. या निकालामुळे वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली.

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा काँग्रेस सन्मान करते. हा निकाल एक प्रकारे श्रद्धा व विश्वासाचाही सन्मान आहे. सर्व समाजघटकांनी न्यायालयाचा निकाल मान्य करून शांतता राखावी. देशातील परस्पर सौहार्द व एकतेची परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, अशी अपेक्षा सुरजेवाला यांनी व्यक्त केली. ‘रामजन्मभूमीच्या निर्णयाचं श्रेय कुठलीही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेनं घेण्याचा प्रश्नच येत नाही,’ असंही ते म्हणाले.