बीटी कापसाच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल!

0 1
मुंबई – बीटी कापसाच्या उत्पादनात महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले असल्याची माहिती राज्य कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नुकतीच संसदेत दिली. बीटी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्राखालोखाल गुजरात आणि तेलंगणा या राज्यांचा प्रत्येकी दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. जनुकीय सुधारणा (जेनेटिकली मॉडिफाइड) करून तयार करण्यात आलेल्या पीकाच्या लागवडीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो, असे ऍग्री बायोटेक ऍक्विजिशन ऑफ इंटरनॅशनल सर्व्हिस – २०१८ च्या अहवालात म्हणण्यात आले आहे.
खासगी लागवडीसाठी मान्यता मिळालेले बीटी कापूस हे एकमेव जनुकीय सुधारणा केलेले पीक (जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप) आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रात बीटी कापसाच्या लागवडीत वाढ झाल्याचे दिसून येते. नागपूर येथील डायरेक्टरेट ऑफ कॉटन डेव्हलपमेंटने दिलेल्या माहितीनुसार, २०१६ – २०१७ मध्ये ३२.३५ लाख हेक्टरवर बीटी कापसाची लागवड झाली होती. यात वाढ होऊन २०१७ – २०१८ मध्ये ३७.८६ लाख हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड झाली असल्याची माहिती मिळाली आहे.