#CABला विरोध; उर्दू लेखक मुजतबा हुसैन परत करणार पद्मश्री पुरस्कार !

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू केले आहे. देशभरात अनेक ठिकाणी याला विरोध होत आहे. ईशान्येकडील राज्यात हिंसक वळण लागले आहे. अनेक साहित्यिकांनी देखील याला विरोध केला आहे. दरम्यान उर्दू लेखक मुजतबा हुसैन यांनी पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकशाही चिरडली जात असल्याने पुरस्कार परत करत असल्याचे मुजतबा हुसैन यांनी स्पष्ट केले आहे. मुजतबा हुसैन यांनी एएनआयशी बोलताना पुरस्कार परत करत असल्याचे सांगितले. मुजतबा हुसैन यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी देशात असहिष्णुता निर्माण झाल्याचे सांगत साहित्यिकांसह अनेकांनी पुरस्कार परत केले होते.

देशात “आपली लोकशाही चिरडली जात आहे. कोणतीही प्रथा राबवली जात नाही आहे. पहाटे ७ वाजता शपथविधी पार पडत आहे. रात्रीच्या अंधारात सरकार स्थापन केले जात आहे. देशात भीतीचे वातावरण आहे असेही मुजतबा हुसैन यांनी सांगितले.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर बोलताना मुजतबा हुसैन यांनी सांगितलं आहे की, “मी ८७ वर्षांचा आहे. या देशाच्या भविष्याची मला चिंता आहे. या देशाच्या आरोग्याची मला चिंता आहे, जे मी माझ्या मुलांसाठी आणि पुढील पिढीसाठी सोडत आहे”.