आता 21 किंवा 22 जुलैला होणार चांद्रयान-२ चे प्रक्षेपण !

0

नवी दिल्ली: भारताचा स्वदेशी बनावटीचा महत्त्वपूर्ण असा चांद्रयान-२ चे प्रक्षेपण दोन दिवसांपूर्वी तांत्रिक कारणामुळे रद्द झाले होते. आता येत्या २१ किंवा २२ जुलैला चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो या दोन तारखांवर विचार करत आहे. १५ जुलैला सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. पण क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाली. त्यामुळे ५६ मिनिटे आधीच उड्डाण रद्द करण्यात आले. चांद्रयान-२ ९७८ कोटींचा प्रकल्प असून अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत चौथा देश असेल. सोमवारी रात्री हे प्रक्षेपण पाहण्यासाठी देशभरातून सात हजार नागरीक श्रीहरीकोट्टा येथे गेले होते. मिशन कंट्रोल सेंटरमध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: त्यावेळी उपस्थित होते.

२१ जुलैला रविवारी दुपारी किंवा २२ जुलैची मध्यरात्रीची वेळ उड्डाणासाठी ठरवली जाऊ शकते. इस्त्रोने अद्याप प्रक्षेपणाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. GSLV MK 3 प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण नेमकी कुठे निर्माण झाली होती. ते इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे.

इंधन आणि ऑक्सिडायझर दबाव निर्माण करण्यासाठी हेलियम गॅस बॉटलचा वापर केला जातो. चांगली बाब म्हणजे गळती दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण रॉकेट खोलण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जुलै महिन्यातच पुन्हा चांद्रयान-२ चे अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे असे एका वरिष्ठ वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. हे नेमकं कशामुळे घडलं ते समजत नाही तो पर्यंत धोका कायम आहे. दुरुस्ती करणे शक्य आहे पण गळती कशी झाली ते समजलं नाही तर पुन्हा ही समस्या उदभवण्याची शक्यता आहे.