आमदार राजूमामा भोळ यांच्या विजयाचा जल्लोष

0

सलग दुसर्‍यांचा विजयी : मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची तुरळक कार्यकर्त्यांची गर्दी

जळगाव– जिल्हा प्रशासनाने नियोजन केल्याप्रमाणे तसेच पोलीस प्रशासनाच्या कडकोट बंदोबस्तात वखार महामंडळ परिसरात सकाळी 8 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे हेच विजयी होतील, अशी कार्यकर्त्यांना खात्री असल्याने अनेकांनी मतमोजणी केंद्राकडे पाठ फिरविल्याने मतमोजणीच्या ठिकाणी तुरळक अशा पध्दतीने कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची हजेरी होती. आहे तेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आकडेवारी जाणून घेवून शहरातील आमदार राजूमामा भोळे यांच्यासह पदाधिकार्‍यांना माहिती देत होते. दरम्यान प्रत्येक फेरीमध्ये आ.भोळे आघाडीवर राहिले. त्यामुळे आधीपासूनच ते विजयाच्या उंबरठ्यावर होते. मतमोजणीच्या 20 व्या फेरीपासूनच जळगाव शहरात जल्लोष सुरु झाला. आणि 29 व्या फेरीत आ.भोळे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा भाजपच्या वसंतस्मृती कार्यालय, जी.एम.फाऊंडेशन, शिवसेना कार्यालय आणि संघ कार्यालयात देखील फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

सात तासांमध्ये 29 फेर्‍या पूर्ण

जिल्हा प्रशासनाने नियोजन केल्याप्रमाणे सकाळी 8 वाजता पहिल्या फेरीला सुरुवात झाली. प्रत्येक फेरीनंतर आकडेवारी ध्वनीक्षेपकावरुन जाहीर करण्यात येत होती. यानंतर माध्यम प्रतिनिधींसाठी मिडीया कक्ष उभारण्यात आला होता. याठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फतही प्रत्यक्षात कागदावरीची आकडेवारी प्रतिनिधींला दिली जात होती. 8 वाजेपासून सुरु झालेली मतमोजणी दुपारी 2 वाजता पूर्ण झाली. अवघ्या तासांमध्ये 29 फेर्‍या पूर्ण झाल्या. टेबलनिहाय ज्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या फेर्‍या पूर्ण झाल्या, ते कर्मचारी बाहेर पडत होते. यानंतर मिडीया कक्षात टीव्हीसमोर बसून राज्याचा निकालाचा आढावा घेत होते.

ईव्हीएम मशीनच्या बॅटरीवरुन काही काळ गोंधळ

ईव्हीएम मशीनच्या बॅटरी कमी अधिक असल्यावरून मतमोजणी केंद्रात जावून पदाधिकारी, कार्यर्त्यांनी अधिकार्‍यांसोबत गोंधळ घातला. याठिकाणी प्रांतधिकार्‍यांनी उत्तर देवूनही कार्यकर्त्यांचे समाधान होते. बॅटरी कमी असल्याबाबत अपक्ष उमेदवाराच्या एका प्रतिनिधीनेही प्रसिध्दीपत्रक जारी करुन प्रसिध्दी माध्यमांना माहिती दिली होती.

चार मशीन बंद पडल्याने मतमोजणीला उशीर

मतमोेजणीच्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणीदरम्यान अचानक तीन ते चार ईव्हीएम मशीन बंद पडले. या मशीनमधील मतदान नेमके किती जाणून घेण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी नियुक्त कर्मचार्‍यांची कसरत उडाली. नेमके मशीनमध्ये काय तांत्रिक अडचण होती हे कळू शकलेले नाही. मात्र त्यामुळे काही काळ मतमोजणीला उशीर झाल्याचे पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

पोलिसांचा फौजफाटा तैनात

वखार महामंडळ परिसरात महामार्गापासून बॅरीकेटस् लावण्यात येवून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. याठिकाणी पोलीस प्रशासनाचे तसेच जिल्हा प्रशासनाचीच वाहने आतमध्ये सोडण्यात येत होती. या व्यतिरिक्त कुठल्याही वाहनांना याठिकाणी परवानगी नव्हती. माध्यम प्रतिनिधींनाही याठिकाणीहून पायीच आत जावे लागले. पुन्हा आत एका ठिकाणी तपासणी करण्यात येत होती. यानंतर शेवटी मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेशव्दाराजवळ पोलीस कर्मचार्‍यांकडून बॅग तसेच प्रत्येक ये-जा करणार्‍यांची कसून तपासणी करण्यात येत होती. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक व कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डॉ. रोहन हे प्रत्येक घटनेची माहिती जाणून घेत होते. कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही.

अनेक जण जेवणापासून वंचित

जिल्हा प्रशासनाकडून याठिकाणी नियुक्त शासकीय कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी, तसेच कर्मचार्‍यांसाठी सकाळी उपमा व पोहे, असा नाश्ता, यानंतर दुपारी जेवणाची सोय करण्यात आली होती. वरण, भात, वांगण्याची भाजी, चवळीच्या दाण्यांची भाजी, पोळी तसेच मोहनताळ असा मेन्यू होता. जेवणाची वेळ सुरु होताच याठिकाणी कर्मचार्‍यांच्या रांगा लागल्या. काही वेळानंतर जेवणातील मेन्यू पैकी पोळ्या अपूर्ण पडल्या. त्यामुळे दिवस-रात्र बंदोबस्तात नियुक्त कर्मचार्‍यांची नाराजी झाली. अनेकांनी स्पष्टपणे नाराजी बोलून दाखविली. यापैकी आहे तेच शिल्लक मेन्यूमध्ये जेवण आटोपून पोटोबा केला तर काही शासकीय कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी जेवणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

पावसामुळे अनेकांची मतमोजणी केंद्राकडे पाठ

गेल्या तीन दिवसांपासून सततचा पाऊस सुरु आहे. गुरुवारी मतमोजणीच्या दिवशीही सकाळपासून संततधार सुरु होती. मतमोजणी केंद्रावर विष्णु भंगाळे, सुनील महाजन, कैलास सोनवणे, ललीत कोल्हे, सचिन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शरद तायडे, यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर सकाळपासून उपस्थित होते. याव्यतिरिक्त इतरांनी केंद्रावर येणे टाळले. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील, मनसेचे जमील देशपांडे यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचेही मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते.

विजय निश्चित होताच भोळेंच्या निवासस्थानी गर्दी

विजय निश्चित होता आमदार राजूमामा भोळे यांच्या घरी पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. आमदार भोळे यांचे सर्वप्रथम पत्नी सीमा भोळे यांनी औक्षण केले तसेच पेढा भरवुन आनंदोत्सव साजरा केला. यानंतर कार्यकर्त्यासमवेत आ.भोळे भाजपच्या वसंतस्मृती कार्यालय, संघाचे कार्याल व यानंतर जी.एम. फाऊंडेशन याठिकाणी आले. याठिकाणी आ. भोळे यांच्या शुभेच्छा देण्यासाठी महिला तसेच पुरुष कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याठिकाणी आ.भोळे यांना पेढा भरवून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच अनेकांनी आमदार सुरेश भोळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देवून आनंदोत्सव साजरा केला.