राजकीय पदाधिकार्‍यांचा नकली दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

0

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी, इतर दोन जण पसार

चाळीसगाव । तालुक्यातील करजगाव येथे एका राजकीय पदाधिकार्‍याचा बनावट दारू निर्मितीचा कारखाना रविवारी, मध्यरात्री पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत 2 लाख 6 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांना अटक झाली आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

करजगाव येथील वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागे बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रतापसिंह शिकारे व कर्मचार्‍यांच्या पथकासह कारवाई करण्यात आली. शाळेच्या पाठीमागे मनोज शरद साबळे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता. पोलिसांनी बनावट देशी दारूचे 79 बॉक्स, स्पिरीट, बॉटल सील पॅक करण्याचे मशीन, रसायन असा एकूण 2 लाख 6 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी मनोज शरद साबळे व विनोद जिभाऊ पवार या दोघांना अटक केली तर मनोज मांडगे व मनोज राजपूत अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोहेकॉ बापूराव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात आरोपींविरूद्ध भादंवि कलम 328,34 व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर हे करीत आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मनोज साबळे याने जिल्हा बँकेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती.