स्वातंत्र्य सैनिकाच्या बहिणीचा मुलगा असल्याचे सांगून शासनाची फसवणूक

0 1

वढोदे येथील सैंदाणेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जळगाव- एका स्वातंत्र्य सैनिकाच्या सख्या बहिणीचा मुलगा असल्याचे खोटे कागदपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवून शासनाची फसवणूक व दिशाभूल केल्याने प्रकाश रामकृष्ण सैंदाणे (रा.वेढोदे, ता. चोपडा) यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश चोपडा तहसीलदारांना अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिले.
प्रकाश सैंदाणे यांनी नोकरी मिळविण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार सखूबाई कोळी यांनी २२ ऑगस्ट २०१६ ला जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती. त्या तक्रारीवरून अप्पर जिल्हाधिकारी यांनी चार वेळा सुनावणी घेतल्या. त्यात प्रकाश सैंदाणे हे स्वातंत्र सैनिक जयराम कोळी यांच्या सख्या बहिणीचा मुलगा असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे पुढील आदेश देण्यात आले आहेत- स्वातंत्र्य सैनिक (कै.) जयराम तुळशीराम कोळी यांनी प्रकाश रामकृष्ण सैंदाणे यांना नामर्निदेशन करून दिलेले पत्र (१४ ऑक्टोबर १९९१)चे रद्द करावे, सैंदाणे यांचे नावे खोटे नामनिर्देशन केले असल्याने त्यांच्या (कोळी) मागे वारस पत्नी-सखूबाई जयराम कोळी यांना शासनाकडून मिळणार्‍या स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तिवेतन वगळून अन्य सवलती (मोफत एसटी, वैद्यकीय खर्च, मृत्यूनंतर पाच हजारांचे अर्थसाहाय्य आदी) रद्द करावेत असे आदेश देण्यात आले.