‘त्या’ फोटोंमुळे प्राध्यापकाची प्रतिमा खल्लास!

0

विद्यार्थ्याच्या चुकीची शिक्षा प्राध्यापकाला, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

जळगाव – विद्यार्थ्याच्या एका चुकीपायी प्राध्यापकाच्या इज्जतीचा जाहीर पंचनामा केला गेल्याचा धक्कादायक प्रकार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात घडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

एरंडोल तालुक्यातील एका महाविद्यालयात कला शाखा, प्रथम वर्षाचा मानसशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना एक विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला. बहिस्थ दक्षता पथकाने ही कारवाई केली. परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. कॉपी केस झालेल्या वर्गावर नियुक्त कनिष्ठ पर्यवेक्षकाचे नाव महाविद्यालयातील फलकावर लिहिण्याचा आगाऊपणा काहींनी केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फलकावर विद्यार्थ्याचा आसन क्रमांक, वर्ग, विषय, कनिष्ठ पर्यवेक्षक आणि पेपरची तारीख लिहिण्यात आली आहे. प्राध्यापकाचे अशा तर्‍हेने नाव लिहून काय साधण्यात आले? ही सर्व माहिती लिहिली जात असताना महाविद्यालयाचे प्रशासन काय करत होते? हा सर्व प्रकार कोणत्या कायद्यात बसतो? विद्यापीठ प्रशासनाने काय दखल घेतली? प्राध्यापकांचा कैवार घेत त्यांच्यासाठी भांडणार्‍या संघटना याप्रकरणी गप्प का आहेत? आदी प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जनशक्तिला या प्रकरणातील एकूण 3 फोटो उपलब्ध झाले आहेत. एका फोटोत दोन प्राध्यापकांची नावे लिहिली आहेत, तर दुसर्‍या फोटोत एका प्राध्यापकाचे नाव पुसून टाकलेले दिसते. याच फोटोत फलकासमोरील बेंचवर पाण्याची बादली आणि कापडाचा तुकडा ठेवलेला दिसतो. तिसरा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा स्क्रीनशॉट आहे.

‘त्या’ फोटोंमुळे प्राध्यापकाची प्रतिमा खल्लास! 1

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झालेला फोटो.