पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा मोठा विजय ; बेन स्टोक्स ठरला विजयाचा शिल्पकार

0

लंडन: क्रिकेटच्या महाकुंभाला अर्थात वर्ल्ड कप २०१९ ला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात झाला. यजमान इंग्लंडने सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजय मिळविला. चार फलंदाजांच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला 311 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांची मिशन वर्ल्डकपची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने या सामन्यात 104 धावांनी विजय मिळवला. बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडला विजय मिळवता आला. या सामन्यात स्टोक्सच्या कामगिरीने 12 वर्षांपूर्वीच्या चमत्काराशी बरोबरी केली.

जेसन रॉय ( 54), जो रूट ( 51), इयॉन मॉर्गन ( 57) आणि बेन स्टोक्स ( 89) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 8 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी’कॉक ( 68) आणि व्हॅन डेर ड्युसन ( 50) वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर ( 3/27), लिएम प्लंकेट ( 2/37) आणि बेन स्टोक्स ( 2/12) यांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचे फलंदाज अपयशी ठरले. या सामन्यात स्टोक्सने अफलातून कॅचसह दोन झेल टिपले.