पेप्सीतून विषबाधा, एरंडोलमध्ये चिमुकलीचा मृत्यू

0

दुसर्‍या मुलीची प्रकृती गंभीर; उपचारासाठी जळगावला हलविले

एरंडोल – शहरातील कागदीपुरा भागात दुपारी घरात खेळणार्‍या दोन लहान मुलींना पेप्सीतून विषबाधा होऊन या घटनेत चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर तिची दोन वर्षीय बहीण अत्यवस्थ झाली आहे. तिला पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे.

कागदीपुरा परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास खदीजा कश्यप शे.इरफान (वय 4 वर्ष) व तिची बहीण सहर अंजुम शे.इरफान (वय 2 वर्ष) या बहिणी घरात खेळत असताना अचानक त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे घरातील सदस्यांना दिसून आले. दोन्ही बहिणींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दोघींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जळगावला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत खदीजा कश्यप शे. इरफान हिचा मृत्यू झाला, तर तिची बहीण सहर अंजुम शे.इरफान हिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही बहिणींना विषबाधा कशामुळे झाली? याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या बहिणींनी प्लास्टिक पिशवीत असलेली थंड पेप्सी खाल्ली असल्याची चर्चा परिसरात होती. दोन्ही बहिणी आपल्या आईसह एरंडोल येथे आजोबांकडे आल्या होत्या. शे.इरफान यांना या दोनच मुली असून, ते जळगाव येथे बांधकाम कारागीर म्हणून काम करतात. याबाबत पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.