चेतन साखरे (जळगाव) – पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे मुंबईत दूधाची टंचाई निर्माण झाली असून, या अडचणीच्या प्रसंगी जळगावचा दूध संघ मुंबईकरांच्या मदतीला धावून गेला आहे. मुंबईवासियांची दूधाची गरज भागविण्यासाठी जिल्हा दूध उत्पादक संघाकडून आवश्यक तेवढा दूधाचा पुरवठा केला जात आहे.
सध्या मराठवाडा, खान्देश व विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात तर पूरस्थितीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यात तर भयावह स्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होत आहे. प्रामुख्याने कोल्हापूरमधून अन्य जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूधाचा पुरवठा केला जातो. यात मुंबई अग्रस्थानी आहे. परंतु, पूरस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून या पुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबईत आता दूधटंचाई जाणवू लागली आहे. अशाप्रसंगी मुंबईकरांची दूधाची मागणी पूर्ण करण्यासाठी जळगाव जिल्हा पुढे सरसावला आहे. मुंबईला जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाकडूनही दूध पुरवठा होत असतो. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे मुंबईत दूध पोहोचत नसल्याने त्याचा भार जळगावच्या दूध उत्पादक संघाने उचलला आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाकडून मुंबईला दररोज 40 हजार लीटर दुधाचा पुरवठा केला जातो. मात्र, सद्यस्थितीला वाढलेली मागणी लक्षात घेता या दूध पुरवठ्यात 26 हजार लीटरने वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.8) 66 हजार लीटर दूधाचा पुरवठा मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे
मुंबईहून नेहमीपेक्षा दूधाची मागणी वाढली आहे. जेवढी मागणी येत आहे तेवढा पुरवठा दूध संघाकडून केला जात आहे. सद्यस्थितीत मुंबईत दूधाची मागणी वाढली असली, तरी उपलब्ध साठ्यानुसार पुरवठा करण्यात दूध संघाला कुठलीही अडचण नाही.
– संजीवकुमार गौतम, कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघ