गिरीश महाजनांचे ‘आकड्यांचे सर्व दावे फोल!

0

जळगाव: भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची एकही जागा निवडून येणार नाही, असा दावा केला होता. मात्र जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील, मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील व रावेर मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष चौधरी हे विजयी झाल्याने निवडणुकीपुर्वी ना. गिरीश महाजन यांनी केलेले सर्व दावे निकालानंतर फोल ठरले आहेत.

लोकसभा, जिल्हा परिषद, धुळे आणि जळगाव महापालिका, नगरपालिका या सर्वच निवडणुकांमध्ये यश मिळविल्यानंतर भाजपाचे संकटमोचक ना. गिरीश महाजन यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला होता. आपण सांगू तेवढ्याच जागा निवडून येतात, असा दावा त्यांच्याकडून वारंवार केला जात होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांना सोयीस्कररित्या बाजूला सारत महाजन यांनी जिल्ह्यावर आपली पकड मजबूत करून राज्यपातळीवर विश्वास संपादन केला होता.

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि संकटमोचक म्हणून ओळख मिळाल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी राजकीय आखाड्यात येईल त्याला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर भाजपा शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला होता. त्यांचा दावा त्यावेळी खरा देखील ठरला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनी जिल्ह्याची जबाबदारी घेत जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे खातेही उघडणार नाही, असा दावा केला होता. मात्र विधानसभेच्या निकालाने त्यांना देखील आसमान दाखविले.
जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आल्याने गिरीश महाजन यांचा दावा फोल ठरला आहे. जनतेला गृहित धरणार्‍या महाजनांना मतदारांनी जमिनीवर आणल्याची चर्चा सुरू
झाली आहे.