ग्रुप डिस्कशन : वाकयुद्ध नव्हे तर मैत्रीपूर्ण चर्चा

0

प्रा. पुनीत शर्मा

ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे दहा उमेदवार बसवले जातात आणि त्यांना एका ठराविक कालावधीसाठी एका विषयावर चर्चा करायला संगीलती जाते की जेणेकरून त्यातून उमेदवाराची बोलण्याची, मुद्दे मांडण्याची आणि ऐकण्याची कला आणि क्षमता बघितली जाते. ग्रुप डिस्कशनचे काही नियम असतात ते जरी अलिखित असले तरी डिस्कशन भान हा मुद्दा विसरता कामा नये.

  1. सर्वात पहिले ग्रुप डिस्कशनचा विषय काय आहे हे समजून घेण फार आवश्यक आहे. विनाकारण ग्रुपमध्ये सर्वात पहिले बोलले पाहिजे हा हट्ट धरून काहीतरी बोलून आपली पत घालविण्यात काही अर्थ नाहीये, त्यामुळे विषय काय आहे हे सर्वप्रथम समजणे हीच हुशारी. जर विषय लक्षात येत नसेल तर इतरांच्या बोलण्यातून समजून आपण बोलायला सुरुवात करावी. एकदा एका ग्रुप डिस्कशन मध्ये कॅपिटल पनिशमेंट भारतात बंद व्हायला पाहिजे काय? हा विषय दिला गेला. हे ऐकताच एका धडाडीच्या कार्यकर्त्याने (साहजिकच विद्यार्थ्यांने) बोलायला सुरुवात केली, त्याची इंग्रजी लय भारी होती त्यामुळे तो पटापटा इंग्रजीत बोलला की जर भारतात कॅपिटल पनिशमेंट बंद केली तर घोटाळे आणखी वाढतील, लोकांच्या मनातून भय निघून जाईल आणि त्याचे परिणाम सरकारी बँकावर होईल, अर्थव्यवस्था डबघाईला जाईल… त्याला मध्येच थांबवून एकाने म्हटले, मित्रा कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशीची शिक्षा होय! आदळला… म्हणून विषय ज्ञान असल्याशिवाय बोलणे कदापी योग्य नाही.
  2. आता जर तुम्हाला विषय समजला असेल तर ते मांडताना त्याच्याशी निगडीत मुद्दे, आकडे, सूची आणि त्याची माहिती प्रस्तुत करायला हवी की जेणेकरून ग्रुप डिस्कशन जज करणारी व्यक्ती प्रभावित होऊन तुम्हाला जास्त मार्क्स देतील. पण जर का पूर्ण माहिती असेल तरच बोलावे अन्यथा पुन्हा विषय भरकटून काहीतरी बोलून लोकांच मनोरंजन करायचे कुठलेही मार्क मिळत नाही हे लक्षात असावे. जर आपल्याला माहिती असावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी नक्कीच गुगल हा सिनेमाचे रिव्ह्यू, ट्रेनची स्थिती आणि पाऊस कधी येईल हे बघण्याखेरीज वापरले तर ते नक्कीच ज्ञान प्रदान करते. जितका विषय ज्ञान तुम्हाला असेल तितके तुम्ही त्या ग्रुप डिस्कशनमध्ये राजासारखे वागेल.
  3. आता जेव्हा तुम्ही बोलताय आणि सर्व जण तुमच्या बोलण्याला नीट ऐकताय तर इथे तुमची जिम्मेदारी आहे की तुम्ही इतरांना देखील त्यात शामिल करायला हवे. त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांची हिमत वाढवून त्यांना बोलके करणे हा पुढाकार जर तुम्ही घेतला तर जज प्रभावित होऊन तुम्हाला चांगले मार्क्स देतात, शिवाय तुमची टीम बिल्डिंगची कला सुद्धा एचआर समोर येते. सभ्यपणाने इतरांना शामिल करवून ग्रुप डिस्कशन हा प्रभावी करता येऊ शकतो पण लक्षात असावे की रागावून कोणाला शामिल करू नये, ही काही गणपतीची मिरवणूक नव्हे की जिथे तुम्ही बळजबरीने इतरांना एक्टिव्ह करताय.
  4. विषयानुसार जर तुमच्याकडे एखादा चांगला मुद्दा असेल तर तो नक्की मांडायला हवा, त्यात कुठलाही संकोच करू नये. ग्रुप डिस्कशनमध्ये सर्व जण एकमेकांशी स्पर्धा करताय त्यामुळे ह्या स्पर्धेत तुम्ही तुमचे बोलणे किती प्रभावीपणे आणि मुद्देसूदपणे मांडतात ह्याचीच कसोटी तिथे घेतली जाते त्यामुळे संकोच, भय, लाजाळूपणा हा ग्रुप डिस्कशन रुमच्या बाहेरच ठेवावा. शाहरुखच्या चकदे इंडिया मधील ‘यह सत्तर मिनिट…’ हा डॉयलॉग इथे कायम लक्षात ठेवावा (एका अटीवर) की इथे फक्त दहा मिनिटेच मिळतात!
  5. ग्रुप डिस्कशनमध्ये बोलत असतांना एका महत्वाच्या गोष्टीचा भान नेहमी ठेवावा की इतरांना देखील बोलायचा अधिकार आहे, त्यांच्याकडे सुद्धा चांगले मुद्दे असू शकतात त्यामुळे त्यांना बोलायची संधी देणे, त्यांचे बोलणे नीट ऐकणे आणि आणि त्यांना प्रत्युत्तर देतांना आपली भाषा ही सभ्य आणि सौम्य ठेवावी विशेषतः मुलींसोबत बोलतांना तर नक्कीच लक्षात असायला हवी. उगाच आरडाओरडा करत ‘नंतर पाहून घेईन’ हा दृष्टिकोन असता कामा नये. ह्याउलट समोरच्या व्यक्तीच्या मुद्द्याला दाद देत तो किती चांगला बोलला पण त्यात काय सुधारणा होऊ शकते आणि त्यामुळे मी हे बोलतोय ह्या स्वरुपात असावी.
  6. सरतेशेवटी जज हे प्रत्येकाला त्याची संक्षिप्त मांडणी करायला सांगतात त्यामुळे आपले बोलणे एक-दोन वाक्यात कसे बोलता येईल ह्याची नीट तयारी करायली हवी. तुम्ही विषयाच्या बाजूने होता की विरोधात हे बघितलं जात नाही, तर तुम्ही तुमचे बोलणे किती प्रभावीरीत्या सादर केले हे लक्षात घेतलं जातं आणि त्या अनुसरून मार्क्स दिले जातात.
    तर ह्याप्रमाणे आपण बघितलं की ग्रुप डिस्कशन कसा करावा. पुढच्या अंकात आपण इंटरव्यू कसा द्यावा हे मालिकेतून बघू…
    (लेखक हे जळगावच्या के.सी.ई.संस्थेच्या आय. एम.आर. कॉलेजचे ट्रेनिंग एंड प्लेसमेंट अधिकारी आहेत)