राष्ट्रपती राजवट लागू झाली तर, महाराष्ट्रावर अन्याय होईल; संजय राऊत

0

मुंबई: राज्यातील सत्तेचा तिढा अजूनसुद्धा सुटला नसून, मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहे, तर भाजपा शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायला तयार नाही. दरम्यान वर्षा बंगल्यावर आज संभाजी भिडे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते. यावर भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. नितीन गडकरी शिष्टाई करणार का? असे विचारलं असता, मुख्यमंत्रीपदाचं लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असंच म्हणावं लागेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसंच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हटले आहेत.

एवढंच नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपाचा डाव आहे असाही आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते त्यांना भेट नाकारण्यात आली का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हाही मध्यस्थीसाठी कोणीही येण्याची गरज नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहे असंही सांगितलं.