हिम्मत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती असे सांगावे; उद्धव ठाकरे

0

लासलगाव: बाळासाहेबांना अटक करण्याची छगन भुजबळांची चूक होती, हे मान्य करावे असा टोला उद्धव यांनी आज आपल्या प्रचार सभेत लावला. येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेवून सांगावे. विभागाचे प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही.

ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी सूडाने कारवाई करणार्‍यांच्या पार्श्वभागावर लाथ घातली असती. शिवशाहीचे सरकार आल्यानंतर कोणाशीही सूडाने वागू नका, जनतेची कामे करा, सुख-समाधान द्या, न्याय्य-हक्कासाठी आंदोलन करणार्‍यांवर लाठ्या चालवू नका, असे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना निक्षून सांगितले होते. असे उद्धव म्हणाले.

शरद पवार यांची ईडी चौकशी ही राजकीय सूडभावनेने झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला होता. त्यांच्या या आरोपाला प्रतिउत्तर देताताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना झालेल्या अटकेची आठवण करुन दिली. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी एका मुलाखतीत खंत बोलून दाखवली. बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य होती. आमच्या मंत्रीमंडळातील काही वरीष्ठांच्या हट्टापायी ही अटक झाली होती. आम्ही त्यास विरोध केला होता. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, असेही म्हटले होते. त्यावेळी आमच्या मताला किंमत नव्हती. त्यामुळे तो निर्णय मागे घ्यायला लावू शकलो नाही, अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली.