क्रिकेटच्या महाकुंभात आज भारताचा पहिला सामना

0

लंडन: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या नेतृत्त्वाखाली आज भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. भारताची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. मागील कामगिरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा इतिहास या सगळ्या गोष्टी मागे टाकून भारतीय संघ विजयी श्रीगणेशा करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर सुरुवातीच्या इंग्लंड आणि बांग्लादेश विरुद्धचे दोन सामने गमावल्याने दक्षिण आफ्रिका संघ विजयासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एक चुरशीची लढत आज बघायला मिळणार आहे. आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ८३ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने ३४ तर दक्षिण आफ्रिकेने ४६ सामने जिंकले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची स्थिती ही वरचढ आहे. वनडे क्रमवारीत भारत दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे.

यांच्यावर मदार
भारताचे पहिले सहा क्रमांक निश्चित आहेत. रोहित, धवन, विराट कोहली, राहुल, धोनी, हार्दिक पंड्या असा क्रमांक ठरला आहे. आता सातवे स्थान एका अष्टपैलूला द्यायचे आहे. त्यासाठी केदार जाधव, रवींद्र जाडेजा आणि विजय शंकर यांच्यात स्पर्धा असेल. केदार जाधव खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे. दोन्ही सराव सामन्यांत तो खेळू शकला नव्हता. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना केदार जाधव सरस ठरतो आणि त्याची फिरकीही प्रभावी ठरते. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात जाडेजाने झुंजार अर्धशतक ठोकले असून, एक विकेटही घेतली होती. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात विजय शंकर अपयशी ठरला होता. तेव्हा लढतीपूर्वीची परिस्थितीनुसार या तिघांपैकी एकाची निवड केली जाईल.