भारतीय लष्करासाठी असणार फोर्सच्या विशेष गाड्या

0

नवी दिल्ली-भारतीय लष्कराला अधिक बळकट करण्यासाठी नेहमीच विविध स्तरावर प्रयत्न सुरु असतात. त्यातच आणखी एक भर पडली असून त्यासाठी फोर्स मोटार्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. गाड्यांच्या निर्मितीत नामवंत म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आता लष्करासाठी विशेष गाड्या तयार केल्या आहेत.

हलके वजन

समाजातील विविध घटकांच्या गरजांनुसार गाडी तयार करण्याचे काम कंपनीकडून कायमच प्राधान्याने करण्यात येते. त्यानुसारच हे आणखी एक पुढचे आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल असे म्हणता येईल. या गाड्या हलक्या वजनाच्या असून त्या लष्करामध्ये विशिष्ट कामांसाठी वापरण्यात येतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या गाड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

कठीण प्रसंगाला येणार मदतीस

लष्कराच्या कामाचा वेग आणि नेमकेपणा वाढावा यादृष्टीने या गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. लष्कराच्या गरजेप्रमाणे ही वाहने मजबूत असून कोणत्याही कठिण प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज असतील. तसेच या गाड्यांची चाचणी अतिशय कठोर पद्धतीने करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. या गाडीच्या सातत्याने दोन वर्ष राजस्थानमध्ये ५० अंश सेल्सिअसमध्ये तसेच हिमालयासारख्या उणे ३० अंश सेल्सिअसमध्ये चाचण्या करण्यात आल्या. या गाड्यांची मोठी ऑर्डर कंपनीला लष्कराने दिली आहे.

पटकन आत शिरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी यामध्ये खास सुविधा करण्यात आली आहे. अतिशय कठिण अशा प्रदेशात वेगाने आणि स्थिरतेने काम करण्यासाठी या गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या चाकांची निर्मितीही वेगळ्या आणि लष्कराला आवश्यक असणाऱ्या पद्धतीची असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

याबरोबरच रॉकेट लाँचर, मशीन गन यासाठीची खास सुविधा या गाड्यांमध्ये करण्यात आली आहे. या गाड्या वजनाने हलक्या असल्याने युद्धप्रसंगी त्या एअरलिफ्ट करुन शत्रूच्या प्रदेशात नेता येऊ शकतात. मेक इन इंडियाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे आमच्यावर विश्वास दाखवून लष्कराने गाड्या खरेदी करण्याची तयारी दर्शवणे ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बाब असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.