सर्वपक्षीय ठराव, सुरक्षादलांसोबत राहणार!

0

दिल्ली । पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी, दुपारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. दहशतवादाच्या विरोधात लढाईसाठी देशातील सर्व पक्ष एक असल्याचा प्रस्ताव या बैठकीत पारित करण्यात आला. सर्वपक्षीयांनी पुलवामा घटनेवर कडाडून टीका केली आहे.

पुलवामाच्या हल्ल्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. यानंतर आजची सर्वपक्षीय बैठक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत सैन्याच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा देण्याची ग्वाही सर्व पक्षांनी दिली आहे.

या बैठकीत 3 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या दुःखाच्या प्रसंगी शहीदांच्या कुटुंबियांसोबत, त्याचप्रमाणे संपूर्ण देशासोबत आम्ही उभे आहोत, दहशतवादाला सीमेपलीकडून मिळणार्‍या समर्थनाचा आम्ही निषेध करतो, गेल्या 30 वर्षांपासून भारत दहशतवादाचा सामना करतो आहे. या दहशतवादाला सीमेपलीकडून मदत मिळते आहे. या लढाईत संपूर्ण देश एकत्र आहे. दहशतवादाशी लढाई करण्यासाठी आम्ही सुरक्षा दलांसोबत आहोत असे या ठरावात म्हटले आहे.