महिला सक्षमीकरण, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी काम
जळगाव – बेरोजगारी, अशिक्षितपणा व आर्थिक अस्थिरतेने अनेक सामाजिक प्रश्नांचा जन्म होतो. या प्रश्नांना योग्य पध्दतीने न हाताळल्यास त्यातून गुन्हेगारीचे बीज रोवले जाते. ही स्थिती उद्भवू नये म्हणून समस्येच्या मूळावर घाव घालणे आवश्यक आहे. त्यासाठी महिला सक्षमीकरण, रोजगार मेळावे, शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने पीपल्स पीस फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली असून, यामार्फत कार्यक्रम राबविण्यात सुरुवात झाली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्या पत्नी मनजित कौर मतानी यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली. आयपीएस अधिकार्याची पत्नी असताना सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मनजित कौर यांनी जनशक्तिच्या जळगाव कार्यालयाला भेट देत विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
मनजित कौर या मूळच्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना लहानपणी आईकडून समाजसेवेचे बाळकडू मिळाले. मनजित कौर यांनी एम. कॉम. केले आहे. पदवीचे शिक्षण घेत असताना, त्यांनी समाजसेवेचे व्रत जोपासून अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वखर्चाने ‘डीप इन्व्हेस्टिगेशन‘ नावाचे मासिक सुरु केले. माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मिळवून, त्याआधारे लेख छापून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.
पीपल्स पीस फाउंडेशनची स्थापना
समाजासाठी काही तर वेगळे करायचे इच्छा असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हते. पती अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची जळगावला बदली झाल्यानंतर मनजित कौर यांनी जळगाव येथेच पीपल्स पीस फाउंडेशनची स्थापना केली. मतानी यांनाही समाजसेवेची आवड असल्याने तेही पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लोकप्रतिनिधी अथवा शासकीय मदतीविना स्वखर्चाने फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून मनजित कौर खर्या पध्दतीने समाजसेवा करीत आहेत. या संस्थने 3 महिन्यात महिलांसाठी भुसावळ व जळगावमध्ये विविध कार्यक्रम घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुढाकार
खाली दिमाग, शैतान का घर.. याप्रमाणे हाताला काम नसल्याने माणसाला विविध गोष्टी सुचतात. या मानसिकतेतून त्यांच्याकडून गुन्हे घडतात. महिलांमधील अज्ञान, त्यांच्यातील न्यूनगंड या मानसिकतेतून बाहेर पाडण्यासाठी काही तरी केले पाहिजे ही भावना मनात होती. महिलांनी मुलांना शिकविले तर देशाची उज्ज्वल पिढी घडेल. रोजगार नसणे ही देखील एक मोठी समस्या आहे. या दोन्ही गंभीर बाबी हेरून त्या अनुषंगाने समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहीम सुरु केल्याचे मनजित कौर यांनी सांगितले. पती अधिकारी असल्याने त्यांची नियमित बदली होते. मात्र तोपर्यंत इतर महिलांना फाउंडेशनच्या कार्यासाठी तयार करणार आहे. त्यामुळे मी नसल्यावरही संस्थेचे कार्य सुरू राहील, असेही मनजित कौर म्हणाल्या.
रोजगार मेळाव्यात 400 पेक्षा अधिक तरुणांना रोजगार
देशातील तरुण हे समर्थ राष्ट्राचा पाय आहेत पण तोच भक्कम नसेल तर राष्ट्र कसे मजबूत राहील? या विचाराने पीपल्स फाउंडेशनतर्फे स्वखर्चातून शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथे लवकरच रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. एम्फोसिस, टेक महिंद्रा यासारख्या देशातील तसेच देशाबाहेरील अशा 150 ते 200 कंपन्या यावेळी हजर राहणार आहे. याद्वारे 10वी, 12वी तसेच एम कॉम, बी कॉम, एमबीए, एमसीए, एबीएम, आटीआय, डिल्पोमा, अभियांत्रिकी अशा 400 पेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. इच्छुक तरुणांनी https://Peoplespeacefoundation.com/job.fair या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. या मेळाव्यासाठी मनोज बियाणी, किशोर ढाके, लोहित मतानी, आनंद गांधी, पंकज दारा यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे मनजित कौर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न
मनजित कौर सद्यस्थितीत कायद्याचे पदवी शिक्षण घेत आहेत. त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचे असून, यासाठी त्यांचा अभ्यास सुरु आहे. जिल्हाधिकारी झाल्यावर समाजकार्य सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पती अधिकारी असल्याने बदली होते. मात्र तोपर्यंत इतर महिलांना फाउंडेशनच्या कामासाठी तयार करणार असल्याचेही मनजित कौर यांनी सांगितले.