मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; एसपींसह 150 कर्मचारी निलंबनाच्या वाटेवर?

0

जळगाव विमानतळावर मोदींचे लपूनछपून चित्रीकरण
व्हीव्हीआयपी सुरक्षा व्यवस्था भेदली, कारवाईची कुर्‍हाड कोसळणार

जळगाव । पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौर्‍यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्या वेळी काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची झाडाझडती घेतली असून, अधीक्षकांसह 150 पेक्षा अधिक पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान एका आमदाराच्या दोन स्वीय सहाय्यकांनीदेखील व्हीडिओ चित्रीकरण करून व्हायरल केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी धुळे दौर्‍यावर आले होते. त्यापूर्वी ते विमानाने जळगाव विमानतळावर आले. मोदी विमानातून उतरत असताना कडक सुरक्षा यंत्रणा भेदून त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. 3 मिनिटे 57 सेकंदाचा हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पंतप्रधानांसह इतरांच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले.

गंभीर प्रकारामुळे दिवसभर बैठका
या प्रकरणी वरिष्ठांनी पोलीस अधीक्षकांसह विमानतळ प्राधीकरणाच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले. त्यामुळे संबंधित चित्रीकरण करणार्‍याच्या शोधासाठी, तसेच तपासासाठी सोमवारी दिवसभर जिल्हा पोलीस दल, विमानतळ प्राधीकरण, एटीएस, राज्य गुप्त वार्ता विभाग, डीएसबी यासह इतर गुप्तचर यंत्रणांच्या अधिकार्‍यांच्या विमानतळावर बैठका पार पडल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती.

पोलिसांसह विमानतळ कर्मचारी दोषी ?
पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी बंदोबस्तातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपापली जागा सोडली आणि ते मोदींना पाहण्यासाठी विमानतळ इमारतीकडे पळाले. तसेच विमानतळावरील सीसीटीव्ही सर्व्हर रुममधील ऑपरेटरचे एकाच सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर लक्ष होते. त्यामुळे त्याचेही चित्रीकरण करणार्‍यांकडे दुर्लक्ष झाले. याप्रकरणी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित सर्व पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक हे लहान दुकानदार, हॉटेलचालकांवर कारवाया करण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विमानतळावरील व्हायरल झालेला व्हिडिओ पाहता मोदींच्या जीवाला धोका होता ही शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेतील गंभीर त्रुटींमुळे हा प्रकार घडला आहे.
– गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री