चक्क, पोलीस निरीक्षकालाच घोड्यावर बसविले!

0

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाची जळगावमधून अनोखी  मिरवणूक

जळगाव । लग्नाची वरात नव्हती पण बँड दणकून वाजता होता, समोर नाचणारे होते पण ते वर्‍हाडी नव्हते, सजविलेल्या घोड्यावर एक व्यक्ती स्थानापन्न होती पण ती नवरदेव नव्हती. एवढी जल्लोषपूर्ण मिरवणूक कोणाची निघाली आहे याअर्थी जळगावकर उत्सुकतेने बघत होते. जळगाव शहर पोलीस ठाण्यातून बदली झालेले पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांना त्यांच्या सहकार्‍यांकडून शुक्रवारी मिरवणूक काढून असा अनोख्या पध्दतीने निरोप देण्यात आला.

शहर पोलीस ठाण्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी बँडही वाजत होता. जळगावमधून बदली झालेले पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांना आग्रहाने आणि सन्मानपूर्वक सजविलेल्या घोड्यावर बसविण्यात आले. पोलीस ठाणे परिसरातून ही मिरवणूक फिरविण्यात आली. यावेळी गुन्हे शोध पथकाचे विजयसिंग पाटील, इम्रान सय्यद, संजय हिवरकर, नवजित चौधरी, प्रीतम पाटील, पीएसआय दीक्षा लोकडे, कर्मचारी भरत पाटील, अमोल विसपुते आदी उपस्थित होते.

जळगाव शहर पोलीस ठाण्यातर्फे दुसर्‍यांदा अशी मिरवणूक निघाली आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची बदली झाल्यानिमित्त त्यांचीही घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली होती.