जागा वाटपापूर्वीच शिवसेना नगरसेवकांना आमदारकीचे स्वप्न

0 1

जळगाव – लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुती येत्या 3 महिन्यात राज्य विधानसभा निवडणुकांना सामोरी जाणार असून, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार जळगाव शहर मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार याची खमंग चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेकडून या जागेसाठी दोन माजी महापौर, एक उपमहापौर यांच्यासह अनेकजण इच्छूक आहेत. शिवाय सुरेशदादांच्या कुटुंबातील एखादा सदस्यही रिंगणात असू शकतो, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

राज्यात युतीचे पहिले सरकार स्थापन झाले, त्यावेळच्या जागा वाटप फॉर्म्युल्यानुसार जळगाव शहराची जागा ही शिवसेनेच्या कोट्यात होती. 1999 आणि 2009 मध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेकडून जळगावचे नेतृत्त्व केले मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीसाठी युतीचा निर्णय शेवटपर्यंत होऊ न शकल्याने भाजपाने सुरेश भोळे यांना उमेदवारी दिली होती. भोळे यांनी मोठ्या मताधिक्क्याने जैन यांचा पराभव केलेला आहे.

मुंबई ते जळगावपर्यंतची परिस्थिती बदलली

2019 मध्ये मात्र, मुंबई ते जळगावपर्यंत परिस्थिती बदलली आहे. गेल्या वेळी युती नव्हती मात्र, आता लोकसभेसह विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही युती करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. 2014 मध्ये सुरेशदादा जैन मनपातील घरकुल प्रकरणी धुळे कारागृहात होते. आज ते जामिनावर बाहेर आहेत. साहजिकच जैन समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. युतीच्या पूर्वीच्या फॉर्म्युल्यानुसार जळगाव शहर मतदारसंघ यावेळी शिवसेनेला मिळायला हवा, असा सूर व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नाही तर जागा वाटपाची प्रतीक्षाही न करता आता आपली उमेदवारी निश्‍चित असल्याचे समजून इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जळगावात लेवा पाटील समाजाचे वर्चस्व असले, तरी 1978 ते 2014 पर्यंत सुरेशदादा जैन सातत्याने निवडून येत होते. आजही त्यांची ताकद मोठी आहे. ते आपला उमेदवार सहजगत्या निवडून आणू शकतात, असा विश्‍वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

सुरेशदादांच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेनेकडून माजी महापौर विष्णु भंगाळे, नितीन लढ्ढा, उपमहापौर सुनील महाजन यांची नावे चर्चेत आहेत. तसेच सुरेशदादांच्या कुटुंबातील एखादा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनपा निवडणुकीच्या वेळी जैन यांच्या कुटुंबातील सदस्य सक्रिय असल्याचे दिसले होते.

भाजपा हक्काच्या जागेवर पाणी सोडणार?

भाजपाचे उमेदवार आ. सुरेश भोळे मोठ्या मताधिक्क्याने जैन यांच्या विरोधात निवडून आले आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला देण्यास भाजपातील काहींचा विरोध आहे. या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर काय तडजोड होते? हक्काच्या निवडून येणार्‍या जागेवर भाजपा पाणी सोडेल का? असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.