पाकिस्तानवर कारवाईसाठी जळगावकर रस्त्यावर

0 2

जळगाव । सरकारने काश्मीरमधील दहशतवाद्यांना कायमच खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला आता शेवटचा धडा शिकवावा, अशी जोरदार मागणी करीत जळगावची तरुणाई शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरली होती. त्यांच्या या मागणीला समर्थन देण्यासाठी शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा जळगावकरांनी तीव्र शब्दात निषेध केला. गेल्या अनेक दशकांपासून काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून खतापाणी मिळत आहे. भारताने अनेकवेळा वारंवार बजावून, प्रसंगी लष्करी कारवाई करून देखील पाकिस्तान वठवणीवर येण्यास तयार नाही. त्यामुळे त्याला आता शेवटचा धडा शिकवा, अशी मागणी जळगावच्या तरुणाईने रस्त्यावर उतरून केली. त्यांना समर्थन देण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

बजरंग दल, विश्‍वहिंदू परिषद, भाजपा, शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनीही बंदचे आवाहन केले होते. प्रत्येकाच्या मनात पाकिस्तानविषयी चीड पाहायला मिळत होती. केंद्र सरकारने प्रतिशोध हा घेऊन खर्‍या अर्थाने शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.