विद्यार्थ्यांना लुटणारे हे कसले विद्यापीठ!

0

राज्यातील अनुदानित विद्यापीठांची स्थापना नेमकी केली आहे कशासाठी? यापैकी काही विद्यापीठे ज्ञानार्जनाचे काम करतात की, विद्यार्थ्यांना लुटण्याचे? यापूर्वी आणि आतादेखील चुकीच्या प्रकारांना पायबंद कोणीच कसा घातला नाही? पूर्वी विद्यार्थ्यांचा कैवार घेणारे आता धोरणात्मक निर्णय घेणार्‍या व्यवस्थांमध्ये आले आहेत तरीही विद्यार्थ्यांची लूटमार का थांबलेली नाही की, खुर्ची प्राप्त होताच यांच्या विचारांचे रंगही झटपट बदलले आहेत? खासगी विद्यापीठांच्या तुलनेत आजही सरकारी अनुदानित विद्यापीठांकडे विद्यार्थी व पालकवर्गाचा ओढा मोठा आहे पण हीच विद्यापीठे आज सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा घात करत आहेत का? गुन्हेगारी क्षेत्रात ‘व्हाईट कॉलर लुटारू’ हा शब्द सर्रास वापरला जातो. हीच मनोवृत्ती आज खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशासनाची झाली आहे का? हे प्रश्‍न नक्कीच ‘बोचरे’ आहेत, परंतु ते का निर्माण होत आहेत याचे आत्मचिंतन विद्यापीठानेच करणे गरजेचे आहे.

विद्यापीठात चुकांचे भांडार आहे पण सध्या कुणी विरोधी सूर आळवत नाही. त्यामुळे काहींचे फावते आहे. राज्यात इतर विद्यापीठांमध्ये कसा कारभार सुरू आहे यापेक्षा आपले खान्देशचे विद्यापीठ अधिकाधिक विद्यार्थीहिताचे कसे होईल याकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. उगाच तत्त्वांच्या गावगप्पा मारायच्या आणि कारभार व्यक्तिकेंद्रित ठेवायचा ही गोचिड विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राला चिकटू नये याचे भान सिनेट किंवा व्यवस्थापन समिती सदस्य नव्हे तर विद्यापीठाशी संबंधित प्रत्येक घटकाने ठेवणे गरजेचे आहे. विद्यापीठात सध्या पेपर तपासणीचा मुद्दा गाजतो आहे. नापास झालेले अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात (तपासणी) पास होत आहेत. उत्तरपत्रिका विद्यापीठातील कॅपमध्ये तपासल्या जातात. त्याचा संबंधितांना मेहताना दिला जातो. मानवी चुका होतात पण त्या अजून किती दिवस चालू देणार आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना कशासाठी? विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले जाते. विद्या शाखांनुसार ही रक्कम वेगवेगळी असते. काही विद्यार्थ्यांना या रकमेसाठी उधारी करावी लागते. यथावकाश परीक्षा होते, निकाल लागतात. त्यानंतर मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केल्यानंतर देखील त्यांच्यावर ‘नापास’चा शिक्का बसतो. अशावेळी या विद्यार्थ्यांची मनस्थिती काय असेल? याचा विचार विद्यापीठ प्रशासनाने करायला हवा. स्वतःविषयी विश्‍वास व खात्री असलेले विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात. त्यासाठी विद्यापीठ शुल्क ‘वसूल’ करते मात्र, या प्रक्रियेत नंतर घाऊक संख्येने विद्यार्थी पास होतात. आताही अगदी तसेच घडले आहे. नापासची नोंद बदलून पासचा निकाल विद्यार्थ्यांना सुपूर्द केला जातो. विद्यार्थीही पास झाल्याच्या आनंदात असतो. तो ‘कायदा’ विसरतो. विद्यापीठाला काही देणे-घेणे नसते. जर निकाल पूर्णपणे बदलत असेल तर विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकनापोटी वसूल केलेले शुल्क प्रामाणिकपणे स्वतःहून परत करण्याची तत्परता विद्यापीठ प्रशासन का दाखवत नाही? ही रक्कम परत करण्यात पळवाटा ठेवायच्या कशासाठी आणि असतील तर त्या बंद कुणी करायच्या?

उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासली न जाणे हा दोष विद्यार्थी वर्गाचा नाही. ही गंभीर त्रुटी विद्यापीठातील आहे याचा विसर विद्यापीठाला पडला आहे का? गेली कित्येक वर्ष पुनर्मूल्यांकन, फोटोकॉपी या माध्यमातून आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक व मानसिक पिळवणूक झाली तर आहेच शिवाय विद्यापीठाने डोळे मिटून दूध पिणार्‍या लबाड मांजरासाठी केलेली ‘कमाई’ वेगळीच आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर सिनेट सदस्य अमोल पाटील, अभाविप यांनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे. आताचे कुलगुरू विद्यार्थीहिताचे निर्णय घेणारे म्हणून ओळखले जातात. आताही ते विद्यार्थीहिताचा निर्णय घेतील, अशी अपेक्षा शैक्षणिक क्षेत्राला आहे. यापुढे पुनर्मूल्यांकनात विद्यार्थी पास होत असल्यास त्याला सुधारित निकालासोबतच त्याने या प्रक्रियेसाठी भरलेले संपूर्ण शुल्क तत्परतेने परत करण्याचा धाडसी निर्णय झाल्यास आपल्या खान्देशच्या विद्यापीठाचे वेगळेपण राज्यात अधिक उठून दिसेल यात शंकाच नाही.
– अमित महाबळ