कर्नाटकचे नाटक!

0 2

देशात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे कर्नाटकची निवडणूक. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि या पक्षांच्या नेत्यांनी जो राजकीय धुमाकूळ घातला आहे, त्याने लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. नाटकी ढंगाच्या राजकीय शेरेबाजीने येथे कळस गाठला असून, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेतल्याचे दिसते. देशामध्ये एवढे महत्त्वाचे विषय बोलण्यासारखे असताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी या निवडणुकीचा आखाडा नव्हे, तर नाटक केले आहे. या नाटकात मतदारांचा मात्र कुठेच उल्लेख नाही, हे विशेष.

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी या ठिकाणी कर्नाटकातच तळच ठोकला आहे. दररोज नवीन आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराला सुरुवात होत आहे. कधी आरोप-प्रत्यारोप तर कधी बनावट मतदान ओळखपत्रांसारखे प्रकार येथे दररोज गाजत आहेत. येथे प्रचारादरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, 2019च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या, तर मी पंतप्रधानान होऊ शकतो. नेमकी भाजपला हीच गोष्ट खटकली असून, राहुल गांधींसारखा युवा पंतप्रधान लोकांच्या मनात घर करून बसू नये म्हणून मोदी यांनी दुसर्‍याच दिवशी राहुल यांना अपरिपक्व म्हटले. मोदी एवढ्यावरच थांबले नसून राहुल यांना उद्धट आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घराणेशाहीवरूनही त्यांनी राहुल यांना लक्ष्य केले आहे. मोदींनी राहुलच नव्हे, तर अगदी पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावरही निवडणूक प्रचारात गंभीर आरोप केले आहेत. नेहरू, इंदिरा गांधी यांचे भारताच्या विकासातील योगदान मोदींनी देशातील जनतेला सांगण्याची खरे तर काहीच गरज नाही. निवडणूक आली की, माननीय पंतप्रधान काय वाटेल ते बोलत असतात हे मागील पाच राज्यांच्या निवडणुकीवेळी देशाने अनुभवले होते. त्यावेळी मोदींनी पाकिस्तानलाही या निवडणुकीच्या रणांगणात खेचले होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर त्यांनी पाकशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. निवडणुकीत अशाप्रकारे अनेकदा त्यांचा तोल सुटला आहे. त्यांनी केलेले आरोप खोटे असतात हे त्यांनाही माहीत असल्याने निवडणुकीनंतर त्याविषयी ते एक शब्दही काढत नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या या आरोपावरून निवडणूक पार पाडल्यानंतरही काँग्रेसने संसदेचे कामकाज अनेक दिवस होऊ दिले नव्हते. शेवटी डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी आदर असल्याचे भाजपनेत्यांना जाहीर करावे लागले होते.

पंतप्रधानांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याने संसदेचे कामकाज होऊ शकले नव्हते. मात्र, त्यासही काँग्रेसच कशी जबाबदार आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मुळात असे घाणेरडे आरोप निवडणुका आहेत म्हणून बेधडकपणे करणे पंतप्रधानपदाला शोभत नाहीत. यामुळे त्या पदाचा आदर कमी होतोच, शिवाय आरोप करणार्‍या त्या व्यक्तिविषयीची विश्‍वासार्हता आणि आदरही कमी होत जातो. कर्नाटक निवडणुकीत विकासावर भाजपनेते अद्याप एकदाही बोललेले नाहीत. हे सर्वात मोठे आश्‍चर्य आहे. या निवडणुकीत भाजपने अच्छे दिनसारखी भरमसाट आश्‍वासने मात्र भरपूर दिली आहेत. आता एअरप्लेन मोडवरून थेट निवडणूक मोडवर गेलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्कमोडवर कधी येणार हाच खरा मुद्दा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यावरून त्यांना चिमटा घेतला होता. एकमेकांची खिल्ली उडवण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नसल्याचे दिसत आहे. मात्र, यासर्व रणधुमाळीत अनेक गंभीर प्रश्‍न जैसे थे आहेत. त्याकडे पाहण्यास सत्ताधार्‍यांसह विरोधकांनाही वेळ नाही. काश्मिरातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. रुपयाचे अवमूल्यन चिंताजनक आहे, तर इंधन दरवाढीमुळे देशातील जनता त्रस्त आहे. चलन तुटवडा अजूनही जाणवत आहे. रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आलेख वाढतच चालला आहे. देशात अशी स्थिती असताना केवळ काँग्रेस किती वाईट आहे, हे सांगण्यात मोदीजींसारख्या महान पंतप्रधानांनी वेळ वाया घालवणे योग्य नाही. काँग्रेस वाईट होती म्हणूनच देशातील जनतेने योग्य व्यक्तीच्या हातात देशाची सूत्रे दिली आहेत. मात्र, जनतेचे प्रश्‍न अजूनही सुटलेले नाहीत. त्याकडे सत्ताधारी पक्षाने गांभीर्याने पाहिले पाहिजे.

कर्नाटकात एका प्रचारसभेत मोदी म्हणाले की, लवकरच काँग्रेस पीपीपी पक्ष होणार आहे. याचा अर्थही त्यांनी सांगितला तो म्हणजे पंजाब, पदुचेरी आणि परिवार. यावर राहुल गांधी यांनीही मोदींना उत्तर दिले. ते म्हणाले, जेडीएसचा अर्थ जनता दल संघ परिवार. अशाप्रकारे देशातील दोन मोठ्या पक्षाचे नेते अविचारी, बालिश शाब्दिक खेळ खेळत असतील तर ते देशाच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही. किमान मोदी यांच्याकडून तरी ते देशातील जनतेला अपेक्षित नाही. निवडणूक प्रचाराची पातळी यापूर्वी इतकी कधीही खालवली नव्हती. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये ते प्रकर्षाने जाणवले आहे. आता कर्नाटक निवडणुकीत पुन्हा तोच अनुभव येत आहे. दोन राजकीय पक्षांचे द्वंद निवडणुकांमध्ये होणे अपेक्षितच. परंतु, आज जे काही सुरू आहे, तो निव्वळ पोरखेळ आहे. निवडणुकांच्या आखाड्यात आता मतदारांच्या भवितव्याला स्थानच राहिले नसून, राजकीय नेते म्हणजे चित्रपट अभिनेत्यांसारखी डायलॉगबाजी करून चमकू पाहत आहेत. निरर्थक संवादफेक करून टाळ्या मिळवण्यातच धन्यता मानली जात आहे. हे संवाददेखील दुसर्‍यांनी लिहिलेले असतात म्हणे. सिनेमाची पटकथा लिहिली जाते तशाच प्रकारे निवडणुकींची भाषणे तयार केली जात आहेत. राजकीय वादविवादही असेच नाटकी असल्याचे दिसते. विनाकारण शब्दछल करून तयार केलेले शब्द, वाक्यांचा वापर करून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्रमांक एकवर आहेत. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा क्रमांक लागतो. परंतु, सत्य परिस्थिती जनतेसमोर येऊ नये, असे जेव्हा राजकीय नेत्यांना वाटते तेव्हाच अशाप्रकारे राजकीय नाटके सादर केली जातात. जनता अशा नाटकांना किती भुलते किंवा भुलणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.