माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे कोअर कमिटीतच!

0

जळगाव – राज्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीतील स्थान कायमच असून या विषयाशी संबंधित बातम्या या दिशाभूल करणार्‍या असल्याची माहिती खुद्द आ. खडसे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली.

भाजपाचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांची कोअर कमिटीतून गच्छंती अशा आशयाचे वृत्त प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. यासंदर्भात ‘जनशक्ति’ने आ. एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता हे वृत्त निराधार असून, या बातम्या दिशाभूल करणार्‍या असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या दिशाभूल करणार्‍या, आ. खडसे यांची माहिती
भाजपाच्या कोअर कमिटीत आपण कायम असून, आज दिवसभर चाललेल्या या मनोरंजनात्मक वृत्ताचा आनंद घेतल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, ना. चंद्रकांत पाटील, ना. सुधीर मुनगंटीवार, ना. पंकजा मुंडे, ना. सुभाष देशमुख, ना. विनोद तावडे, आ. आशिष शेलार, सुरजित ठाकूर, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांचा समावेश आहे

महाराष्ट्रातच फिरणार
मागील लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षनेता असताना उत्तर महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरलो होतो. त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातच फिरणार असल्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी
स्पष्ट केले.

शनिवारपर्यंत पहिली यादी
भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 18 आणि 22 रोजी अनुक्रमे याद्या जाहीर होऊ शकतात, असेही आ. खडसे यांनी सांगितले.