Friday , February 22 2019

नशिबाचे फासे पुन्हा फिरले… ‘खडसे इज बॅक’!

नशिबाचे फासे हे कधी, केव्हा आणि कसे फिरतील याचा काही भरवसा नसतो. ते जेव्हा फिरतात तेव्हा मात्र, आयुष्य बदलून टाकतात. याचा अनुभव भाजपाचे हेवीवेट नेते तथा माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी घेतला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर हुकमी एक्का म्हणून खडसेंची ख्याती होती. राज्य विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून पाहिले गेले, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर देखील त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांना महसूलसह तब्बल आठ खात्यांच्या कारभार देवून खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याकाळात मुख्यमंत्र्यांपेक्षा खडसेंचा जास्त रुबाब होता. हे अनेक मंत्री व आमदार आजही खासगीत बोलतांना मान्य करतात. मात्र अचानक नशिबाचे फासे फिरले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रीपदाचा खडसेंना राजीनामा द्यावा लागला. लाल दिवा गेला, पॉवर गेली, जवळची माणसेही हळूहळू कमी व्हायला लागली. अशातच जवळच्यांकडूनच त्यांच्यावर कुरघोडीचे प्रयत्न झाले. यातून प्रचंड मनस्ताप तर झालाच, परंतु दिवसेंदिवस पक्षातील वजन व वलय कमी होत असल्याने साहजिकच त्यांची अस्वस्थता वाढत गेली. त्यामुळे स्वपक्षावर बेछूट आरोप करण्याच्या चुकाही त्यांच्या हातून घडल्या. ज्या पक्षासाठी आयुष्याची तब्बल 40 वर्षे वेचली त्या पक्षाने दूर लोटले ही त्यांच्या मनातील खदखद वेळोवेळी बाहेर पडत राहिली. खडसे पक्ष सोडतील या चर्चेपर्यंत हा वाद पोहचला होता. गेल्या दीड-दोन वर्षातील आ. खडसेंची भाषणे एकतर टीका करणारी होती, नाही तर हतबलता दाखवणारी होती. राज्यातील आक्रमक नेता अशी ओळख असतांना त्यांची देहबोली मात्र, त्यांना साथ देत नव्हती. परंतु, आधी म्हटल्याप्रमाणे नशिबाचे फासे हे कधी, केव्हा आणि कसे फिरतील याचा काही भरवसा नाही. गेल्या महिन्यात दिल्ली दौर्‍यावरुन परतल्यानंतर त्याचा प्रत्यय खडसेंबाबतीत पुन्हा एकदा येत आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देत फिरण्यासाठी हेलिकॉप्टरदेखील उपलब्ध करुन दिले आहे. एरव्ही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांवर मंत्रायलयात बैठक घेवून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या सूचनांना पुन्हा एकदा महत्त्व आले आहे. याआधी दोन वेळा दौरा रद्द करणारे मुख्यमंत्री पुढील आठवड्यात (दि.21) भुसावळला येण्याचे निश्‍चित झाले आहे. या बदलांचे प्रतिबिंब खडसेंच्या देहबोली व भाषणांमध्येही दिसून येत आहे. एरवी पक्षाला घरचा आहेर देणारे खडसे मुख्यमंत्री व सरकारच्या कामांची तोंड भरून स्तुती करताना दिसत आहे. ‘खडसे इज बॅक’चा प्रत्यय नुकत्याच झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या शक्ती संमेलनादरम्यान आला. संमेलनस्थळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासारखे बडे नेते होते. मात्र त्यांचे सभामंडपातील आगमन अदखलपात्र ठरले तर खडसेंच्या आगमनावेळी संपूर्ण सभागृह उभे राहून टाळ्यांच्या गजरात ‘नाथाभाऊ आगे बढो’च्या घोषणा देत होते. ही बाब राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या नजरेने हेरली असेल, हे सांगायची गरज नाही. याचे प्रतिबिंब खडसेंच्या भाषणावेळी त्यांचा आवेश व देहबोलीतून दिसले.

खडसेंच्या पुनरागमनाला योगायोग म्हणता येणार नाही किंवा पक्षाची मेहरबानीदेखील नाही. गेल्या चार वर्षात विविध आरक्षण आंदोलनांमध्ये फडणवीस होरपळून निघाले आहेत. जाती-पातीचे राजकारण शिगेला पोहोचले असताना ओबीसींना दुखावून चालणार नाही हे सर्वच पक्षांनी हेरले आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर चार-साडेचार वर्ष तुरुंगवारी भोगून आल्यानंतरदेखील राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सक्रीय राजकारणाच्या प्रवाहत आणले. राज्यात ओबीसी व भुजबळ असे समीकरण असतांना त्यांना शह देण्यासाठी भाजपाकडे खडसेंव्यतिरिक्त पर्याय नाही हे भाजपा श्रेष्ठींना उमगले आहे. खडसेंनीही झाले गेले विसरून सर्वांशी जमवून घेण्याच्या दृष्टीने वाटचालीचे संकेत दिले आहे. फक्त हे किती काळ चालते? हा बदल खडसे समर्थक व विरोधक कसे स्वीकारतात? याचा परिणाम जिल्ह्याचा व राज्याच्या राजकारणावर कसा होतो? या प्रश्‍नांची उत्तरे आगामी काळच देईल!

Spread the love
  •  
  • 1.6K
  •  
  •  
  •  
    1.6K
    Shares

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!