लोकसभेचे निकाल ‘अनपेक्षित’ लागणार

0 2

देशातील जनभावना न कळल्याने अंदाज चुकतील, राज्यस्तरीय पक्षांचे महत्त्व वाढेल

नवी दिल्ली – 17 व्या लोकसभेची घोषणा झाल्यानंतर संभाव्य राजकीय स्थितीचे आडाखे बांधले जात आहेत. देशातील दोन अग्रगण्य संस्थांनी नुकतेच ओपिनियन पोल जाहीर केले आहे. यात कोणताही एक पक्ष अथवा आघाडीला स्पष्ट बहुमत दर्शविण्यात आलेले नाही. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार तर निवडणुकीचे निकाल ‘अनपेक्षित’ लागतील आणि हा सर्व राहुकाळाचा प्रभाव असेल.

लोकसभा निवडणुकीची घोषणा रविवारी (दि.10) सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांनी झाली, त्यावेळी क्षितीजावर सिंह राशी (उदित) होती. चंद्र मेष राशीत होता आणि राहु काळाचाही प्रभाव होता. या ग्रहस्थितीमुळे लोकसभा निवडणूक ही अनेक आरोप-प्रत्यारोप आणि शंका-कुशंका यांचे केंद्र बनणार आहे. लग्न राशी सिंह स्वभाव स्थिर ठेवते. राशी स्वामी सूर्य असून, लग्नचक्रातही ही रास सर्वोत्तम आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रशासनाची पकड घट्ट राहील. विरोधी पक्षांना मोठा संघर्ष करावा लागेल. निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणणार्‍यांनी शांत बसणे हेच त्यांच्यासाठी फायद्याचे असणार आहे. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी राहुकाळ व अग्नितत्त्व राशीच्या प्रभावामुळे हे अडथळे आल्यावाचून राहणार नाहीत.

भावी सत्ताधार्‍यांना मिळेल चांगले बहुमत, व्यक्ती महात्म्य प्रभावी राहील
निवडणुकीची घोषणा झाली, त्यावेळी केतुचे नक्षत्र अश्‍विनीमध्ये चंद्राचे भ्रमण होते. याचा परिणाम म्हणजे निवडणुकीत जनतेच्या भावना अधिक प्रभावी राहतील. संभाव्य सत्ताधार्‍यांना लोकसभेत चांगले बहुमत मिळेल. लग्न चक्राच्या भाग्यस्थानी चंद्र असल्यामुळे मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा अधिक असेल. देशभरात राष्ट्रवाद, क्षेत्रवाद नव्हे तर जाती, धर्म, संप्रदाय इत्यादी पारंपरिक घटकांचा प्रभाव राहणार आहे. मावळत्या लोकसभेतील अनेक चेहरे पुन्हा एकदा निवडून येतील. व्यक्ती महात्म्य हा घटक निश्‍चितपणे निकालांवर परिणाम करणारा राहील.

शनि, केतुचा प्रभाव बुचकळ्यात टाकेल
शनि व केतुचा प्रभावच असा आहे की, देशातील जनतेची भावना सर्वेक्षक आणि राजकीय विश्‍लेषक यांना शंभर टक्के समजून घेता येणार नाही. निवडणूक निकालाचे चित्र ‘अनपेक्षित’ असेल.

निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा वाढणार
सत्ताधार्‍यांसाठी निवडणूक घोषणेच्या वेळी असणारी ग्रहस्थिती सकारात्मकता वाढविणारी आहे. सत्ताधारी आणि निवडणूक आयोग आपल्या विरोधकांना वेळेआधीच निष्प्रभ करण्यात यशस्वी ठरतील. केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा व सन्मान अधिक वाढेल. दक्षिण भारतात राहु काळ विशेषत्त्वाने मानला जातो. या दरम्यान यात्रा करणे टाळले जाते. परंतु निवडणूक कार्यक्रमाची घोषणा ही पूर्वनियोजनानुसार करण्यात आली आहे. अशास्थितीत राहु काळामुळे लागणारा दोष कमी होतो. मात्र, अनपेक्षित अडचणी उद्भवण्याची शक्यता अधिक असते. उमेदवार जाहीर झाल्यानंतर बंडखोरीचे प्रमाण कमी असेल. कार्यकर्ते पक्षाकडून देण्यात आलेल्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहतील. राज्यस्तरीय पक्ष अधिक मजबूत होतील, त्यांचे महत्त्व वाढेल.