उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग अन् चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच

0

तीन दिवसात उमेदवार निश्‍चित होणार; राजकीय वर्तुळातील सूत्रांची माहिती

जळगाव । जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांबाबत सोशल मीडियावर ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली जोरदार चर्चा सुरू आहे. जसजशी नावे समोर येत आहेत तसतसे चर्चेचे गुर्‍हाळ सुरू असुन इच्छुकांनी देखिल गुडघ्याला बाशिंग बांधुनच ठेवले आहे. कुणाचा तरी पत्ता कट होऊन आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणुनही काहीनी देव अक्षरश: पाण्यात टाकले आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर मतदारसंघासाठी दि. 23 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी दि. 28 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याला अवघे 15 दिवस उरले आहेत. अद्याप गुलाबराव देवकर यांच्याव्यतीरीक्त उमेदवार निश्‍चीत झालेले नाही. भारतीय जनता पार्टीकडुनही जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघातील इच्छुकांची नावे ही पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठविण्यात आली आहे. तर दुसरीकडे आघाडीत रावेरच्या जागेचा तिढा कायम
राहीला आहे.

रावेरची जागा काँग्रेसकडे?
रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही सध्या राष्ट्रवादीकडे आहे. या मतदारसंघातुन राष्ट्रवादीकडुन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी आ. अरूणभाई गुजराथी आणि संतोष चौधरी यांची नावे चर्चेत आहे. तसेच ही जागा मिळावी अशी मागणी काँग्रेसने देखिल केली आहे. दरम्यान प्रदेशपातळीवर अद्यापही अंतीम जागावाटप झाले नसुन वरीष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. असे असतांना सोशल मिडीयावर मात्र रावेरची जागा ही कणकवलीच्या बदल्यात काँग्रेसला सोडल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत कुठलींही अधिकृत घोषणा झाली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. काँग्रेस पक्षाकडुन या जागेसाठी डॉ. उल्हास पाटील व निळकंठ फालक हे इच्छुक उमेदवार आहेत.

जळगावातून खा. ए.टी.पाटील यांचा पत्ता कट?
जळगाव लोकसभा मतदारसंघातुन भाजपाकडुन विद्यमान खा. ए.टी.पाटील यांचा पत्ता कट झाला असुन त्यांच्या जागी विधानपरीषद सदस्या आ. स्मिता वाघ यांना उमेदवारी निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांच्याही नावाची ‘ब्रेकींग’ केली जात आहे. मुळात भाजपाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे ही नावे पाठविण्यात आली असून अद्याप कुणाचाही पत्ता कट नाही किंवा कुणालाही उमेदवारी निश्‍चित झाल्याचे अधिकृत जाहीर झाले नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. असे असले तरी सर्वच उमेदवार हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे.

चर्चा अन् आनंदाच्या उकळ्या
सोशल मिडीयावर उमेदवारांची नावे निश्‍चीत झालेल्याच्या चर्चांनी इच्छुकांना मात्र काही क्षण का होईना आंनदाच्या उकळ्या फुटत आहेत.