माढ्यातून पवारांची तयारी मग जळगावातून देवकरांची का नाही?

0

जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष असलेल्या खा. शरद पवार यांनी (इच्छा नसतांनाही) माढा या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी दाखविली आहे. असे असताना जिल्हा नेत्यांकडून शिफारस करण्यात आलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक का लढू नये? असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे.

जिल्ह्यात जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर गत 20 वर्षापासून भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. शिवाय हे दोन्ही मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिश्यावर आहेत. पण या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आत्तापर्यंत पराभवाचेच तोंड पाहावे लागले आहे.

राज्यात आघाडीचे सरकार असताना जळगाव जिल्हा हा विरोधकांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. म्हणजेच सत्ता काळातही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागला आहे. गत निवडणुकीत खा. शरद पवार यांनी भावनिक आवाहन करून देखील या दोन्ही जागांवर मात्र, भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळेची लोकसभा निवडणूक ही भाजपा विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.

जळगाव जिल्ह्यात नेतृत्वाचा शोध
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. ईश्‍वरलाल जैन, माजी आ. अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. डॉ. सतीश पाटील, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यासारखे मातब्बर पदाधिकारी असतांनाही निवडणुकांसाठी राष्ट्रवादी नेतृत्त्वाच्या शोधात आहे. स्थानिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व करण्याची कुणीही तयारी दाखवत नसल्याने ‘उपर्‍या नेतृत्वा’वर वेळ निभावावी लागत आहे.

जळगावसाठी इच्छूक अनेक पण देवकरांवर जोर अधिक
जळगाव लोकसभेसाठी अनिल भाईदास पाटील, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, प्रमोद पाटील, विकास पवार अशी इच्छुकांची नावे आहेत. परंतु माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा आग्रह जिल्हा नेत्यांनी केला आहे. देवकरांनी मात्र सुरवातीपासूनच ‘नकारघंटा’ वाजविली आहे. विधानसभा निवडणूकच बरी असे म्हणत देवकरांनी खुद्द खा. शरद पवार यांना लोकसभेसाठी नकार दिला आहे.

मोदींची भीती की संघटनात्मक कमजोरी?
लोकसभा निवडणुकीसाठी 2014 प्रमाणे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची जादू चालण्याची भीती सध्या राष्ट्रवादीसह विरोधकांना आहे. कारण स्थानिक पातळीवर लोकांचे मनपरिवर्तन करण्यात विरोधक आजही कमजोर अवस्थेतच आहे. शिवाय पक्षांतर्गत गटबाजीचाही धोका लक्षात घेता लोकसभा लढविणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका देवकरांसह अनेकांच्या मनात घर करून आहे.

देवकर ‘नशीबवान माणूस’
गुलाबराव देवकर हे तसे ‘नशीबवानच’. नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा लढविली आणि जिंकली. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांची थेट जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली. तेव्हापासून देवकर हे ‘नशीबवान माणूस’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आता त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची गळ घालण्यात आली आहे. अनुभव, राजकीय परिपक्वता, कार्यकर्त्यांची फळी, सुक्ष्म नियोजन आणि विरोधकांना नमविण्याची ताकद, असे सारे काही असतांना आणि पवारांची साथ असतांना नशिबाने दमदार असलेल्या देवकरांनी जळगाव लोकसभा का लढू नये? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.