Friday , February 22 2019

गिरीश महाजन पवारांबद्दल काय म्हणाले?

शिवरायांचे आम्हीच खरे वंशज, बारामतीला येऊनच दाखवतो !

जळगाव – आगामी निवडणुकांसाठी मला अनेक ठिकाणांहून निमंत्रण मिळत आहे. आ. अनिल गोटे म्हणतात धुळ्याला ये, शिवसेनेचे आ. किशोर पाटील म्हणतात पाचोर्‍यात येऊन दाखवा आणि राष्ट्रवादीचे आ. अजित पवार म्हणातात बारामतीला येऊन दाखवा. आता एकच माणूस कुठून-कुठून निवडणूक लढवेल? पण आता बारामतीला येऊनच दाखवतो अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पवारांचे आव्हान स्वीकारले.

महामार्गावरील अटलनगर येथे आज भाजपाच्या शक्ति केंद्र प्रमुखांचे संमेलन रविवारी, झाले. या संमेलनात बोलतांना ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, धुळ्याचे आ. अनिल गोटे यांच्या जिभेला सध्या हाड नाही. धुळ्याच्या निवडणुकीत त्यांची चुकून एक जागा आली. ‘मारा तो मारा, मार के देख’ अशीच त्यांची परिस्थिती झाली आहे. दुसरीकडे मित्रपक्षाचे म्हणजेच शिवसेनेचे आ. किशोर पाटील आणि राष्ट्रवादीचे आ. अजित पवार यांनीही त्यांच्या मतदार संघात बोलावले आहे. सुक्ष्म नियोजन केले तर कुठलीही निवडणूक जिंकणे सहज शक्य आहे मग ती बारामतीची नगरपालिका असली तरी ती देखील जिंकता येईल, असे मी विधान केले होते. परंतु आता मी बारामतीला येऊनच दाखवतो असे सांगत ना. महाजनांनी पवारांचे
आव्हान स्वीकारले.

शिवरायांचे आम्हीच खरे वंशज!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुठभर मावळे सोबत घेऊन अनेक किल्ले जिंकले. यातील काही किल्ले हे गनिमी काव्याने जिंकले. अहमदनगर येथे झालेल्या निवडणुकीत आमचे 14 नगरसेवक निवडून आले. पण अख्खी राष्ट्रवादीच सोबत घेऊन त्या ठिकाणी आम्ही सत्ता स्थापन केली. अहमदनगरचे हे युध्द आम्ही गनिमी काव्यानेच जिंकल्याने शिवरायांचे खरे वंशज आम्हीच असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.

शरद पवारांसह गांधी घराण्यावरही टीका

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भाजपा सरकार संवेदनाहीन असल्याचे म्हटले. प्रत्यक्षात त्यांनी लोकांना आतापर्यंत भुलथापाच मारल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न एवढी वर्षे सत्तेत असूनही पवारांनी का नाही सोडविला? असा सवाल ना. महाजनांनी उपस्थित करून त्यांच्यावर टीका केली. आमच्या सरकारला संवेदना असल्यानेच राज्यात मोर्चे निघाले आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रियांका गांधी राजकारणात आल्याने काहीही फरक पडणार नाही. आताची पिढी इंदिरा गांधी यांना ओळखत देखील नाही. त्यामुळे प्रियांका गांधींच्या येण्याने काही वातावरण बदलणार नाही. भाजपाचे नरेंद्र मोदी हे ‘शेर’ आहेत. त्यांची शिकार करण्यासाठी जंगलातील इतर प्राणी एक होत आहे. पण ‘इस शेर की, शिकार इतनी आसान नही’ असेही त्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकणार

उत्तर महाराष्ट्र आता भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परीषदा, पंचायत समित्या आज भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा करीत ‘एक बार मैने कमिटमेंट की, तो मै अपने आप की भी नही सुनता’ असा डॉयलॉग ना. महाजन यांनी मारला.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!