आठवीपर्यंतचे विद्यार्थी विनापरीक्षा पास

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट (वर्गोन्नती) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, कोरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षण विभागाने मधल्या काळात ऑनलाइन, ऑफलाइन, यूट्यूब, गूगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. पहिली ते चौथीच्या शाळा आपण संपूर्ण वर्षभर सुरु करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या, तर काही ठिकाणी नाही. जेथे शाळा सुरू झाल्या तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाही. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खरे पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे, मात्र यावर्षी ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.