कामातील गैरप्रकार भोवले, कारवाईचे वरिष्ठांचे आदेश
जळगाव । महावितरणचे तीन अभियंते आणि एका लाईनस्टाफला कामातील हलगर्जीपणा व गैरप्रकार भोवला असून, त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे, अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय काळम पाटील यांनी गेल्या आठवड्यात जळगाव शहरात गणपतीनगर, महाबळ कॉलनी आणि संधी कॉलनी भागात अचानक केलेल्या क्षेत्र तपासणीत निवासी वीज कनेक्शनचा वापर सर्रास वाणिज्य वापरासाठी केला जात असल्याचे, तसेच इतरही काही गंभीर गैरप्रकार आढळून आले होते. याप्रकरणी काळम पाटील यांनी संबंधित कक्ष अभियंत्यावर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच धुळ्यातील एका व्यापारी संकुलात दुकानाचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित (पीडी) केलेला असतानाही तेथे नवीन वीज कनेक्शन देण्यात आल्याचे आढळून आले होते. या ठिकाणीही संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी अखेर जळगाव शहरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण बिसेन, एमआयडीसी कक्ष क्रमांक 1 चे सहायक अभियंता देवेंद्र भंगाळे, लाईनस्टाफ राकेश वंजारी, धुळे शहरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र सारडा यांना निलंबित करण्याचे आदेश विरिष्ठांनी काढले आहेत. 3 ते 6 महिन्यांसाठी हे निलंबन असून, चौकशीत काय निष्पन्न होते यावर पुढील कार्यवाहीचे स्वरूप अवलंबून असणार आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. अधीक्षक अभियंता फारुक शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी निलंबित अभियंता व कर्मचार्यांच्या कामात चूक झालेली आहे. यापुढे असे होऊ नये म्हणून आजची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले. जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी चौघांवरील कारवाई प्रशासकीय स्वरुपाची असल्याचे सांगितले.
महावितरण जनतेला अखंडित सेवा देण्यासाठी कटिबध्द आहे. परंतु, जे अधिकारी व कर्मचारी गैरकृत्य, बेकायदेशीर काम करतील त्यांच्यावर यापुढेही अतिसक्त स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. जनतेच्या तक्रारी असल्यास त्यांनी महावितरणच्या संकेतस्थळावर त्या नोंदवाव्यात किंवा वरिष्ठ अधिकार्यांना कळवाव्यात. जे अधिकारी, कर्मचारी चांगली सेवा देतील त्यांचादेखील सन्मान करण्यात येईल.
विजयकुमार काळम-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण कोकण प्रादेशिक विभाग