कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांची यादी बनवा : पंतप्रधान मोदी

0

नवी दिल्ली: मोदी सरकार २ ने गेल्या काही दिवसात धाडसी निर्णय घेत, ऐतिहासिक यश मिळवले आहे. तीन तलाक, कलम ३७० या निर्णयाचे देशभरातून कौतुक होत आहे. दरम्यान या घेतलेल्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका न्यूज संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली. कलम ३७० बाबत त्यांनी सांगितले की, तुम्ही अशा लोकांची यादी बनवा ज्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याला विरोध केला. या यादीत तुम्हाला स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांप्रती सहानभुती असणारे लोकं आणि विरोधी पक्षातील काही नेते दिसतील. देशातील सामान्य नागरिक केंद्राने घेतलेल्या जम्मू काश्मीर, लडाखच्या निणर्याचे स्वागत, समर्थन करतांना दिसत असल्याचा निर्वाळा मोदींनी या वेळी केला.

हा विषय राष्ट्राचा असून त्यात कुठलाही स्वार्थ नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. हळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल. कलम ३७०, ३५ ए मुळे सर्वात मोठे नुकसान असे झाले की आजतागायत जम्मू काश्मीर, लडाखचा आर्थिक विकास झाला नाही. मात्र आता काश्मीरच्या आणि लडाखच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

तसेच माझ्या जम्मू काश्मीरमधील बंधू, भगिनींना उज्ज्वल भविष्य हवे आहे. मात्र कलम ३७० मुळे ते शक्य नव्हते. राज्यातील महिला, मुले, अल्पसंख्याक समुदायामधील लोकांवर प्रचंड अन्याय झाला आहे. आता बीपीओपासून स्टार्टअप पर्यंत, खाद्य संस्कृतीपासून पर्यटनापर्यंत अनेक उद्योग काश्मीर मध्ये उभारले जातील. स्थानिकांना रोजगार मिळेल, शिक्षणाच्या संधी चालून येतील असं पंतप्रधानांनी सांगितले.