व्यवस्थापकीय अभ्यासक्रम प्रवेशाला पुन्हा स्थगिती !

0

पुणे : व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. कारण पुन्हा व्यवस्थापकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासक्रम सुरू होणे अपेक्षित असताना तांत्रिक कारणांमुळे या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्याची सुनावणी २८ ऑगस्टला होणार आहे. मुंबईतील जमनालाल बजाज महाविद्यालयात प्रवेशाबद्दल झालेल्या गोंधळामुळे आणि तंत्र शिक्षण संचालनालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

बजाज महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रवेश देणे आवश्यक होते. परंतु स्थानिक विद्यार्थ्यांना ७० टक्के जागा आरक्षित करून प्रवेश दिले. त्यामुळे इतर विद्यपीठांतील विद्यार्थ्यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या व्यवस्थापकीय अभ्यासक्रमाबरोबर असलेल्या ‘व्यवस्थापकीय पदविका’ (पीजीडीएम) अभ्यासक्रमाच्या तासिका सुरु होऊन एक महिना झाला आहे. आमच्या प्रवेशाबद्दल अजून काहीच हालचाल नाही. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या सुनावणीनंतर जरी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली तरी अभ्यासक्रम सुरु व्हायला १५ दिवस लागतील. डिसेंबर महिन्यात परीक्षा असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्याला दीड महिनाच मिळेल. यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण होऊच शकत नाही. तसेच इंटर्नशिपसाठीसुद्धा वेळ मिळणार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.