यावल तालुक्यात ज्वारीसह मक्याचे प्रचंड नुकसान

0

यावल : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकातील सुमारे 12 हजार हेक्टरावरील ज्वारीसह 15 हजार हेक्टरावरील मका या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतात कापून ठेवलेल्या या पिकावर पावसामुळे कंन्सामधून थेट कोम निघाले असून शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलर गेला आहे तर आता या सर्व शेती क्षेत्रातील पंचनामे होऊन शासनाकडून शेतकर्‍यांना मदतीची अपेक्षा आहे. यातील काही शेेतकर्‍यांनी खरीप पीक विमादेखील काढला असून विमा कंपनीला देखील कळवण्यात आले आहे.

पावसामुळे शेतकरी संकटात

यावल तालुक्यात खरीप हंगामामध्ये सुमारे 12 हजारहून अधिक हेक्टरावर ज्वारी व सुमारे 15 हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रावर मक्याचा पेरा शेतकरी वर्गाने केला होता. यंदा चांगल्या पावसामुळे उत्पादन अगदी भरूभरून आले होते तर आता ज्वारी आणि मका हा अनेक शेतकर्‍यांनी कापून शेतात ठेवला होता व लवकरच त्यातून उत्पादन काढायला सुरुवात करणार होते. मात्र 18 ऑक्टोंबरपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी दिली. यात शेतकर्‍यांना सदरील कापून ठेवलेल्या पीक उचलण्याची देखील संधी मिळाली नाही. या पावसामुळे आता कापून ठेवलेल्या शेतातील या पिकातून थेट कोम निघाले आहेत त्यामुळे शेतकर्‍यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पेरणी, मशागत करून व हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास आता हा निसर्गाने हिरावून नेल्याचे चित्र आहे. आता प्रशासनाच्या वतीने शेतकर्‍यांना तत्काळ पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे.

तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी खरीप पीक विमादेखील केलेला आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी ज्याच्यात बँकेतून व वित्तीय संस्थेतून विमा काढला त्यांच्याकडे नुकसान झाल्यास संदर्भातील माहिती कळविण्यात आली आहे. विमा कंपनी शेेतकर्‍यांना नुकसान भरपाई तत्काळ देईल का ? याकडे लक्ष लागले आहे.

खरीप हंगामात सहा हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक पेरले होते तसेच दोन हेक्टरवर मका पीक घेण्यात आले होते व यंदा चांगले दमदार असे उत्पादन निघणार होते त्या दृष्टीने कापणी करून शेतात आता लवकरचं उत्पादन काढण्याची तयारी सुरू असतानाच पावसामुळे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले असून सर्व पीकातून कोम निघाले असल्याची भावना शेतकरी रवींद्र वासुदेव बाऊस्कर यांनी व्यक्त केली.