डेटिंग साईटच्या नादी लागणे पडले महागात; ऑस्ट्रेलियात भारतीय तरुणाची हत्या

0

मेलबर्न-ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे ऑनलाईन डेटिंग साईटवर ओळख झालेल्या तरुणीला भेटायला गेला असताना भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मौलिन राठोड (२५) हा तरुण चार वर्षांपूर्वी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. तो अकाऊंटस् मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिथे गेला होता. सोमवारी रात्री मौलिन डेटिंग साईटवर ओळख झालेल्या तरुणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. काही वेळाने पोलिसांना फोन वरून मौलिन जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मौलिनला रुग्णालयात दाखल केले. मौलिनला गंभीर दुखापत झाली होती. रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

मौलिन हा मूळचा अहमदाबादचा असल्याचे समजते. मौलिनचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी त्याच्या मित्रांनी पैसे गोळा केले असून लवकरच त्याचा मृतदेह भारतात आणले जाणार आहे. मौलिनची डेटिंग साईटवरुन १९ वर्षांच्या तरुणीशी ओळख झाली होती. त्या तरुणीला भेटण्यासाठी तो गेला होता. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.