प्रत्येक अश्रूचा बदला घेणार!

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गर्भित इशारा, जनतेला संयम ठेवण्याचे आवाहन

धुळे – पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल. लवकरच या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येईल, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. धुळे शहरातील गो-शाळेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी, धुळे जिल्ह्यातील विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खा. हिना गावित, खा. ए. टी. नाना पाटील, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते.
दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवांनाना श्रध्दाजंली वाहण्यात येऊन कुठलाही स्वागताचा कार्यक्रम न करता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

… तर सोडत नाही
मोदी म्हणाले की, भारत स्वतःहून कोणाचे नाव घेत नाही, मात्र या देशाला कुणी डिवचले तर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहात नाही. परंतु, आताची वेळ संयम ठेवण्याची आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहणे आपली जबाबदारी आहे. या कुटुंबियांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूंचा बदला घेतला जाईल. त्यात कोणतीही कसर ठेवणार नाही, असेही मोदी
म्हणाले.

विकासकामांचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मान्यवरांच्या हस्ते धुळे ते नरडाणा, जळगाव ते मनमाड नवीन रेल्वेमार्ग, जळगाव ते उधना दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामांचे भूमिपूजन, तसेच भुसावळ ते वांद्रे , नंदुरबार ते उधना मेमू ट्रेन व उधना ते पाळधी मेमू ट्रेन या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. सरकारच्या अमृत योजनेंतर्गंत अक्कलपाडा धरणातून धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटारी, केंद्र सरकारच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत शिंदखेडा तालुकयातील सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतर्गंत निम्न पांझरा मध्यम अक्कलपाडा प्रकल्प या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधानांकडून धुळे जिल्ह्यासाठी भरघोस निधी :  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सुलवाडे – जामफळ प्रकल्पामुळे शिंदखेडा व धुळे तालुक्यातील 100 गावांचा फायदा होणार असून, धुळे जिल्हा नंदनवन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पासाठी भरघोस निधी मिळवून दिला असून, हा सिंचन प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

धुळ्याचा चेहरामोहरा बदलवून दाखविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धुळे ते नरडाणा रेल्वेमार्ग आणि सुलवाडे-जामफळ सिंचन योजनेमुळे धुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे. मुंबई-दिल्ली कॉरिडोर प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. आघाडी सरकारने 60 वर्ष केवळ चर्चा केली.

मनपा निवडणुकीतील आश्‍वासनाची पूर्तता
धुळे महापालिकेच्या निवडणुकीत जनतेला आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करीत तीन महिन्यात अक्कलपाडा ते धुळे पाईपलाईन टाकण्याच्या योजनेचे भूमिपूजन केले आहे. याशिवाय शहरातील रस्त्यासाठी 100 कोटी आणि भुयारी गटारीची योजनाही मंजूर करूनही चार महिन्यात 500 कोटींचा निधी धुळे महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिला असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी प्रास्ताविक केले.