जळगाव विमानतळावर मोदींना मिळालेल्या ‘त्या’ भेटीची जोरदार चर्चा

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव विमानतळावर 17 मिनिटे थांबा

राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत : महापौरांनी दिले ‘बहिणाबाईं’च्या कवितांचे पुस्तक

जळगाव । धुळे येथील मनमाड – इंदौर रेल्वे मार्गाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी, जळगाव विमानतळावर दुपारी 2.05 वाजता भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खान्देश दौर्‍याविषयी संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, नियोजित कार्यक्रमासाठी शनिवारी, पंतप्रधानांचे जळगाव विमानतळावर भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने आगमन झाले. दु. 2 वाजून 3 मिनिटांनी पंतप्रधानांचे विमान धावपट्टीवर उतरतांना दिसले. पंतप्रधानांसमवेत राज्यपाल के. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विमानात होते. विमानतळावर उतरल्यानंतर आ. राजूमामा भोळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे यांनी त्यांचे स्वागत केले. महापौर सीमा भोळे यांनी हिंदीतील अनुवादीत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिले.
यावेळी आ. स्मिता वाघ, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

विमानतळासह परिसराला छावणीचे स्वरूप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार असल्याने विमानतळासह परिसरात एसपीजीच्या कमांडोंसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच वायू सेना, स्थल सेना, नैसेना यांची हेलिकॉप्टर्स होती. विमानतळावर अग्निशमन दलाचे 7 बंब, 7 रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स, प्राधिकरण व पोलीस अशी यंत्रणा उपस्थित होती. कडेकोट बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.