मोदींच्या भाषणामुळे विरोधक बिथरले

0

‘मिशन शक्ती’वर घेतले आक्षेप, निवडणूक आयोग करणार तपासणी

नवी दिल्ली । क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याच्या ’मिशन शक्ती’ या भारताच्या यशस्वी मोहीमेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी प्रसारमाध्यमांद्वारे देशाला दिली. निवडणूक आचारसंहिता असताना मोदींनी केलेल्या या भाषणावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोदींनी भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप माकपने केला आहे. या प्रकरणी माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित लेखी तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. तसंच निवडणुकीच्या काळात त्यांनी भाषण केले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असं येच्युरी यांनी पत्रात म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही मोदींच्या भाषणावर आक्षेप नोंदवला आहे. मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. मोदी काय अंतराळात गेले होते?, अशी बोचरी टीकाही ’मिशन शक्ती’च्या भाषणावरून ममता बॅनर्जींनी मोदींवर केली.