ईश्‍वरलाल जैन यांचे भाकित, मोदी आत्महत्या करतील!

0

रफालप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. ईश्‍वरलाल जैन यांचे भाकित
मी कुणाला घाबरत नाही, जे व्हायचे ते होईल, अशी दर्पोक्तीही केली

जळगाव । रफालचे प्रकरण इतके भयंकर आहे की, या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर तीनच पर्याय राहतील. त्यात पहिला पर्याय मोदी जेलमध्ये जातील, दुसरा पर्याय जेलमध्ये जायचे नसल्यास ते आत्महत्या करतील किंवा देश सोडून पळून जातील, असे धक्कादायक भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. ईश्‍वरलाल जैन यांनी आज राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या जिल्हा बैठकीत बोलताना केले.

लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आयोजित जिल्हा बैठकीत मार्गदर्शन करतांना माजी खा. ईश्‍वरलाल जैन यांनी धक्कादायक विधान करून खळबळ उडवून दिली आहे. ‘मी कुणाला घाबरत नाही, जे व्हायचे ते होईल,’ अशी दर्पोक्ती करत जैन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढविला. मला परिणामांची चिंता नाही, कारण मी क्लिन आहे, असेही त्यांनी त्यांनी सांगितले.

पुलवामा घटनेवेळी मोदी शुटींग करत होते
पुलवामा घटनेवरून भाजपाने आठवडाभरातच राजकारण केले. मुळात ही घटना घडली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळे पोषाख घालून त्याचे शुटींग करीत होते. त्यानंतर त्यांनी नाश्ता केला आणि मग त्यांनी या घटनेची माहिती घेतल्याचा गौप्यस्फोटही माजी खा. जैन यांनी बैठकीत केला. अजूनपर्यंत पुलवामा घटनेतील जवानांना शहीद म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. गुप्तचर विभागाची माहिती असतांनाही जवानांच्या जीवाशी या सरकारने खेळ खेळला. जनतेला फसवणारे आणि जवानांच्या विषयावरून राजकारण करणार्‍या नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा येणार नसल्याचेही सुतोवाच त्यांनी केले.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाचाही उमेदवार समोर दिसतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संघटीतपणे काम करून पवारसाहेबांना या वेळेला तरी जिल्ह्यातून लोकसभेच्या जागा जिंकल्याची भेट देऊ, असे आवाहन माजी खा. जैन यांनी केले. या बैठकीला जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, गफ्फार मलिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.