विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर

0

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ७ जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेचा (एसटीआय) निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे यांनी राज्यात पहिला येण्याचा बहुमान पटकाविला आहे. तर, मागासवर्गीय प्रवर्गातुन ठाणे जिल्ह्यातील प्रमोद केदार हे पहिले आहे आहेत. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील शीतल बंडगर या महिला प्रवर्गातुन पहिल्या आल्या आहेत.

शिवाजी जाकापुरे यांना १५६ तर केदार यांना १४८ गुण मिळाले आहेत. तसेच, बंडगर यांना १४१ गुण मिळाले असल्याची माहिती एमपीएससी प्रशासनाने दिली आहे. या परीक्षेच्या निकालातून २५१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची विक्रीकर निरीक्षक पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या मुख्य परीक्षेला ४४३० विद्यार्थी बसले होते. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

या निकालातुन शिफारशीसाठी निवडण्यात न आलेल्या परीक्षार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांनी दहा दिवसात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. दरम्यान, सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीन पदांसाठी गेल्या वर्षी संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यातून साधारण ३ लाख ३० हजार ९०९ विद्यार्थी बसले होते. यातून ४,४३० उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी करण्यात आली होती. परीक्षार्थ्यांना त्यांचा निकाल एमपीएससीच्या वेबसाइटवर पाहता येईल.