पुढील १० दिवसात सत्तास्थापन होणार; शरद पवार

0

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला तरी सेना, भाजपा यांच्यातील मुख्यमंत्री पदावरून वाद कमी होत नसल्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाकीत भाजपाच्या नेत्यांनी केले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात येत्या १० दिवसात सत्ता स्थापनेचा प्रश्न सुटेल असे भाकीत वर्तवले आहे.

पुढील 10 दिवसांत शिवसेना, भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा अंदाज पवारांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्यासाठी भाजपाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं लागेल, असं पवार म्हणाले आहेत. आम्हाला शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें सोबत माझं बोलणं झालेले नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात लवकर सत्ता स्थापन व्हावी असं म्हणत त्यांनी अयोध्या प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष वेधलं. अयोध्या प्रकरणाचा निकाल येण्यापूर्वी राज्यात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे. कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेनेनं पोरखेळ थांबवून सत्ता स्थापन करावी, असं पवार म्हणाले.

राज्यात 56 जागा जिंकणारी शिवसेना सत्तेच्या समान वाटपासाठी आग्रह आहे. लोकसभेवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळावा. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशा शिवसेनेच्या मागण्या आहेत. मात्र पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याशिवाय गृह, अर्थ, महसूल, नगरविकास यांच्यासारखी महत्त्वाची खाती शिवसेनेला न देण्याची भूमिका भाजपानं घेतली आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू आहे.