यंदा नोटा मतदानाची आकडेवारी वाढली

0

सर्व विधानसभा मतदानसंघात नोटाचा मतदारांकडून वापर ः गेल्यावर्षी 16 हजार 836 तर यंदा 25 हजार 588

किशोर पाटील

जळगाव – भारताच्या संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला आहे. या हक्कानुसार प्रत्येकाचे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. याव्दारे देशाच्या विकासासाठी आवश्यक उमेदवार निवडून आणण्यामध्ये आपला सहभाग असतो. मात्र कुठल्याही उमेदवाराला मत न देता नोटाच्या पर्यायाचा वापर करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र 2014 च्या व 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीचा अभ्यास केला असता, दिसून आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्याच्या सर्वच विधानसभा मतदारसंघात अनेक मतदारांनी नोटाच्या पर्यायाचा वापर केला असून 2014 पेक्षा ही आकडेवारी मोठी असल्याची दिसून आले आहे.

…रोहिणी खडसे-खेवलकर विजयी झाल्या असत्या

यंदा विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना तिकिट नाकारण्यात येवून त्यांच्या एैवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे- खेवलकर यांना उमेदवारी मिळाली होती. या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. चुरशीच्या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. विजय उमेदवार चंद्रकात पाटील यांना 91 हजार 092 एवढी मते मिळाली तर रोहिणी खडसे यांना 89 हजार 135 एवढी मते मिळाली. याठिकाणी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 1 हजार 806 जणांनी नोटाचा पर्याय वापरला. नोटाची आकडेवारी निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे ताजे उदाहरण आहे.

2014 मध्ये नोटात दिग्गजांचे मतदारसंघ होते आघाडीवर

2014 मध्ये जिल्ह्यात पार पडलेल्या विधानसभा मतदार संघातही मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या निवडणुक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये 2264 एवढे नोटाचे मतदान झाले होते. या खालोखाल दुसर्‍या क्रमाकांवर संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या जामनेर मतदारसंघात 1 हजार 796 जणांनी नोटाचा पर्याय वापरला होता. या दिग्गजांच्या दोन्ही मतदारसंघात सक्षम पर्याय असतांनाही नागरिकांनी नोटाचा सर्वाधिक वापर केला होता.

गेल्या पंचवार्षिक पेक्षा यंदा नोटा मतदानात वाढ

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर, जामनेर या मतदारासंघांमध्ये सक्षम पर्याय असतानाही मतदारांनी नोटाचा वापर केला होता. त्यानुसार सर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 16 हजार 833 नागरिकांनी नोटाचा पर्याय वापरला होता. यंदाच्या निवडणुकीत नोटाच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. यंदाही सर्वच विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी नोटाचा पर्याय वापरला. निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारी यंदा जिल्ह्याच्या सर्व मतदारसंघात एकूण 25 हजार 588 जणांनी नोटाचा पर्याय वापरला. गेल्या वेळेपेक्षा यंदा यात 9 हजाराने वाढ झाली. नोटा पर्याय वापरणार्‍यांमध्ये यंदा जळगाव शहर मतदारसंघात आघाडीवर होते. येथील 4 हजार 998 म्हणजेच पाच हजारावर नागरिकांनी नोटाचा पर्याय वापरला.

नागरिकांची मानसिकतेत का होतोय बदल?

आपल्या शहराच्या, देशाच्या विकासासाठी सक्षम उमेदवाराचा निवड करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नोटाचा पर्याय वापरणार्‍यांची आकडेवारीत वाढ होत आहे. काही मतदारसंघांमध्ये नोटा मते निर्णायक ठरली. या कारणही तसेच आहे, ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे कुणीही उमेदवार निवडून आल्यावर विकास होत नसेल आहे तेच चित्र राहणार असेल मतदान करुन उपयोग काय? या मानसिकतेतून कुणालाही मत न देता नागरिकांकडून नोटाचा वापर केला जात आहे. तोच राम तोच गडी या अशाप्रकारे प्रत्येकाकडून कारभार सुरु असेल तर नागरिकांची मानसिकता बदलणारही कशी? हाही खरा प्रश्न आहे. त्यामुळे निर्णायक ठरणार्‍या नोटाच्या आकडेवारीमुळे पक्षांनी लोकप्रतिनिधीं नेमक्या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.

‘नोटा’चा वापर करणार्‍यांची आकडेवारी
मतदारसंघ – वर्ष 2019 वर्ष 2014
मुक्ताईनगर – 1806 2264
रावेर- 1946 1722
भुसावळ – 3277 1447
चोपडा- 2175 1885
जळगाव- 4998 1256
जळगाव ग्रामीण 2382 1603
अमळनेर- 1503 1162
एरंडोल- 1995 992
चाळीसगाव- 1677 1437
पाचोरा- 1724 1272

एकूण 25588 16836