राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली वेधशाळेने

0

पुणे : पुण्यासह राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात 27 ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वार्‍यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, ज्वारी, कपाशी पीक पूर्णपणे नष्ट झाले. या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसलाला मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात कापणी केलेले भातपीक पुरते वाया गेले आहे.

राज्यात पावसाचा कहर सुरूच

राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. या पावसामुळे हाती आलेली बाजरी, ज्वारी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे 40 टक्क्यांहून अधिक मका, बाजरी, ज्वारी पीक खराब झाले आहे. सोयाबीन पीक शेतात सडू लागली आहेत. येत्या 24 तासांत राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुष्काळी बीड, लातूर आणि उस्मानाबाद मध्ये पाऊस पडत आहे. पण हाती आलेले पीक वाया गेले आहे. परभणीत सलग तिसर्‍या दिवशी मुसळधार पडत असून कापूस, मका पिकाचे नुकसान झाले आहे.