पाकच्या नाड्या आवळल्या, जळगावातून रसद रोखली

1

नुकसान सहन करू, पण पाकिस्तानला केळी पाठवणार नाही

शहिदांसाठी सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र केला एजन्सीची भूमिका

पाकवर कारवाई होईपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी

जळगाव – रोेज 50 लाखाचे नुकसान सहन करू, पण पाकिस्तानला केळी पाठवणार नसल्याची खंबीर भूमिका महाराष्ट्र केला एजन्सीने घेतली आहे. पाकविरोधात पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. या घटनेविरोधात देशभरातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच दहशतवाद्यांना पाठिंबा देणार्‍या पाकीस्तानविरोधात थेट कारवाई करण्याची मागणी होत आहे. एवढेच नव्हे तर पाकसोबत असलेले सर्व व्यावहारिक संबंध संपुष्टात आणण्याचीही मागणी आता जोर धरू लागली आहे. देशभरातून पाकविरोधात आगडोंब उसळेलेला असताना जळगाव जिल्ह्यातही त्याची झलक दिसत आहे. जळगाव जिल्हा हा केळी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

जिल्ह्यातील रावेर, यावल, सावदा या परिसरातून केळीची पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. दररोज किमान 25 ट्रक केळी पाकिस्तानला निर्यात होत असल्याची माहिती महाराष्ट्र केला एजन्सीचे किशोर हरीश गनवाणी यांनी ‘जनशक्तिशी’ बोलतांना दिली. केळीचा एक ट्रक 2 लाख रूपयांना जाते. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकविरोधात आर्थिक व्यवहार तोडण्याची प्रत्यक्ष कृती जिल्ह्यातील महाराष्ट्र केला एजन्सीने अंमलात आणली आहे. पाकिस्तानला केळी निर्यात न करण्याचा निर्णय महाराष्ट्र केला एजन्सीने घेतला असून, अशा प्रकारची कृती अंमलात आणणारी ही एकमेव संघटना आहे. रोज 50 लाखाचे नुकसान झाले तरी चालेल. पण पाकिस्तानविरोधात जोपर्यंत केंद्र सरकार ठोस कारवाई करीत नाही तोपर्यंत पाकिस्तानला केळी न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे किशोर गनवाणी यांनी सांगितले.

आपल्या देशातील जवानांवर वारंवार हल्ले होत आहे. दहशतवाद्यांना पाकचा पाठिंबा असल्यानेच अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. पुलवामा येथील घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अशा परिस्थितीत पाकविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी.

किशोर गनवाणी, महाराष्ट्र केला एजन्सी