सफाई कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या- आयुक्त

0 2

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभागातील महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि चेंजिंग रुम उपलब्ध करुन द्यावे. तसेच, प्रत्येक सफाई कर्मचा-याला बारा साबण, सहा मोठे हात रुमाल, दरमहा दोन झाडू, मास्क आणि हातमोजे द्यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त तथा आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष श्रावण हर्डीकर यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीची त्रैमासिक बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी श्रावण हर्डीकर होते. याप्रसंगी त्यांनी आदेश दिले. उपाध्यक्ष ऍड. सागर चरण, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहायक आयुक्त मनोज लोणकर, डॉ. मनोज डोईफोडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे, डॉ. माधुरी माछरे, अनिल चावरे, रामपाल सौदा आदी उपस्थित होते.

सफाई कर्मचा-यांना दरमहा सुरक्षा साधने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिका-यांची आहे. त्यात त्यांनी हलगर्जीपणा करु नये. नालेसफाई करताना कोणताही कर्मचारी सुरक्षा साधनांशिवाय नाल्यात उतरला जाऊ नये. त्याबात तक्रारी आल्यास आरोग्य निरीक्षकाविरोधात कठोर कारवाई करु, असा इशारा आयुक्त हर्डीकर यांनी दिला. यंदा पहिल्यांदाच सफाई कर्मचा-यांना हिवाळ्यात स्वेटर दिले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.