पंतप्रधानांच्या जळगाव दौर्‍यात सुरक्षा यंत्रणेत त्रुटी

0 1

दोषींवर कारवाई होणार, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची माहिती

जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौर्‍यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्या वेळी काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. कडक सुरक्षा यंत्रणा भेदून केवळ200 मीटर अंतरावरुन करण्यात आलेल्या या चित्रीकरणामुळे सुरक्षा रक्षेचे धिंडवडे निघाले आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गंभीर प्रकरणाची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. यात एखादा पोलीस कर्मचारीही सहभागी असल्यास त्याचीही गय केली जाणार नाही, नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह इतर मंत्री शनिवारी धुळे दौर्‍यावर होते. त्यासाठी विमानाने ते जळगावात दुपारी 1.50 वाजता दाखल झाले होते. यादरम्यान त्यांचे चोरुन चित्रीकरण झाल्याच्या व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

काय आहे व्हिडीओत
दोनशे मीटरच्या अंतरावरच पाईपांमधून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. विमान पोहोचल्यानंतर प्रथम सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी विमानातून बाहेर येतात. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव आदी येतात. त्यानंतर एका मिनिटांनी पंतप्रधान मोदी येतात. शूटिंग करणार्यांच्या तोंडून सर्वच मंत्र्याचे नाव घेतले जाते. त्यानंतर मोदी जेव्हा विमानातून बाहेर येतात, तेव्हा त्यांचा टायगर म्हणून हे उल्लेख करतात.

चित्रीकरण करणारे स्थानिकच असल्याचा अंदाज
3 मिनिटे 57 सेकंदाचा हा व्हिडीओ असून ज्या पाईपात उभे राहून अथवा बसून हा व्हिडीओ करण्यात आला आहे. तो पाईप नेमका विमानतळ परिसरात कोणत्या ठिकाणी आहे. त्या जवळ किंवा आसपास त्यावेळी कोणत्या कर्मचार्‍याची ड्युटी होती, आवाजावरुन किंवा व्हिडीओत उल्लेख झालेल्या नावावरुन नावाची तसेच आवाजाशी संबधित विमानतळ परिसरात कोण इसम, अथवा कर्मचारी होती या सर्व बाजूने यंत्रणेकडून तपासाला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान बोली भाषेवरून शूटिंग करणारे स्थानिकच असल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

एखाद्या व्हीव्हीआयपी व्यक्तीला असते, त्याप्रमाणे संपूर्ण कडक बंदोबस्त होता. केवळ तीनच शासकीय छायाचित्रकारांना परवानगी देण्यात आली होती. विमानतळ परिसरातून किंवा बाहेरुन दूरवरुन हा व्हिडीओ केला का याची चौकशी सुरु आहे. संबंधित प्रकरणात कुणीही असला तरी तसेच तो पोलीस कर्मचारी असला तरी त्याची गय न करता कठोर कारवाई केली जाईल.
– दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक