पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तुर्कस्तान दौरा रद्द

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला तुर्कस्तान दोन दिवसीय दौरा रद्द केला आहे. काश्मीर प्रकरणात पाकिस्तानला समर्थन केल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांत काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचं समर्थन करत भारताचा विरोध केला होता. एवढ्यावर न थांबता पॅरिसमध्ये झालेल्या आर्थिक परिस्थिती सोडवणाऱ्या कृती दलाच्या बैठकीतही तुर्कस्ताननं पाकिस्तानचं समर्थन केलं होतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, तुर्कीनं वारंवार पाकिस्तानचं समर्थन केल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पाऊल उचलत आपला दोन दिवसीय दौरा रद्द केला आहे. 27-28 रोजी सौदी अरबमधल्या एका गुंतवणुकीसंदर्भातील शिखर परिषदेनंतर मोदींचा तुर्कस्तानचा दौरा प्रस्तावित होता. परंतु तुर्कीच्या पाकिस्तानचं समर्थन करण्याच्या भूमिकेमुळे भारत आणि तुर्कस्तानचे द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. आतापर्यंत भारत, तुर्कस्तान मध्ये व्यावहारिक संबंध आलेले नाहीत.

मोदींनी तुर्कीच्या दौऱ्यात दोन्ही देशांमधील व्यापार आणि सुरक्षा संबंध सुधारण्याची आशा केली होती. परंतु आता ते अशक्यच आहे. तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयानंही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मोदींचा दौरा नियोजित नव्हता, त्यामुळे रद्द होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याच वर्षी ओसाकामधल्या जी-20 परिषदेत मोदी आणि अर्दौआन यांची भेट झाली होती, जुलै 2018 मध्ये अर्दोआनसुद्धा दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते.