मूर्ती म्हणून घेतले पार्सल, निघाले पिस्तुलासह जिवंत काडतूस

0

खासगी बसच्या चालक-वाहकासह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

चाळीसगाव – चाळीसगाव ते पुणे मार्गावरील एका खासगी बसमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस जप्त केले. सोमवारी (दि.6 ) रात्री 12 वाजेच्या सुमारास खुलताबादेत बसच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चाळीसगाव येथील रहिवासी चालक-वाहकाला अटक करण्यात आली असून पार्सल देणार्‍या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास चाळीसगाव ते पुणे (व्हाया औरंगाबाद) मार्गावर धावणार्‍या सरस्वती ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये (एम. एच. 20 ई जी 1276 ) बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसचे पार्सल असल्याची माहिती मिळाली. पथकाने खुलताबाद येथे वेरूळ टी पॉईंटला सापळा रचून बसला अडवले. यानंतर तपासणीत चालकासमोर एका पिशवीतील खोक्यात गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस आढळून आली. पोलिसांनी चालक शेख बद्रोद्दीन शेख अलीमोद्दीन (40, रा. नवागाव, चाळीसगाव) व वाहक समाधान दगडू मोरे (23 रा.देवळी ता.चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले आहे. चालक-वाहक व पार्सल देणार्‍या एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. गणेश मुळे, दिपेश नागझरे, नदीम शेख, बाबा नवले यांच्या पथकाने केली.

चाळीसगावात खळबळ, स्थानिक पोलीस अनभिज्ञ

चाळीसगाव येथून दररोज 10 ते 12 खासगी बसेस पुण्याला जातात. मात्र या वाहतुकीच्या आडून गैरप्रकारही केले जात असल्याचे औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री केलेल्या प्रकारामुळे दिसून येते. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून चक्क पिस्तुल आणि जिवंत काडतुसे चाळीसगाव येथून पुण्याकडे जातात याबाबत चाळीसगावच्या स्थानिक पोलिसांना याची खबरही लागूू नये याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चाळीसगाव हे चार जिल्ह्यांच्या सीमेवर असून, उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणार्‍या अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 हा याच शहरातून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावत असतात. या वाहनांतून कशाची वाहतूक होते? हे तपासणारी कुठलीही तपासणी यंत्रणा नाही. चिरीमिरी देवून शस्त्र वाहतुकीचे अनेक गैरप्रकार सर्रास होत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. आतापर्यंत चाळीसगाव येथून किती पिस्तुले पुण्याकडे वाहनाद्वारे गेली आहेत? चाळीसगाव परिसरात गावठी कट्टा विक्री करणारी टोळी तर कार्यरत नाही ना? असे प्रश्‍न यामुळे निर्माण झाले आहेत. गावठी कट्टे पुरविणार्‍या टोळीचे चाळीसगाव परिसर व्यावसायिक केंद्र तर नाही ना असा प्रश्‍न जनतेत चर्चिला जात आहे. त्यामुळे याचाही सोक्षमोक्ष लावण्याची गरज निर्माण झाली आहे.